
केवळ संस्कृतच नव्हे तर तामिळसुद्धा देवाची भाषा आहे. देशभरातील प्रत्येक मंदिरांमध्ये संतांनी तामिळ भाषेत रचलेले भजन गायला पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले. आपल्या देशात केवळ संस्कृत हीच देवाची भाषा असल्याचे मानले जाते, परंतु लोक बोलत असलेली प्रत्येक भाषा देवाची भाषा आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
कारूर जिह्यातील एका मंदिरात तिरूमुराईकल, तामिळ मंत्र आणि संत अमरावती अतरांगरई करूरच्या पठणासह देवपूजा करण्यासाठी सरकारी अधिकार्यांना निर्देश द्या, अशी विनंती करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एन. किरुबाकरण आणि न्यायमूर्ती बी. पुगालेंधी यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण मते नोंदवली.
न्यायालयाची मते
- विविध देश आणि धर्मांमध्ये भिन्न श्रद्धा आहेत. संस्कृती व धर्मानुसार प्रार्थनास्थळेही भिन्न आहेत. देवाशी संबंधित कामांसाठी स्थानिक भाषेचा वापर केला जातो. मात्र आपल्या देशात संस्कृत हीच देवाची भाषा असल्याची श्रद्धा आहे. इतर कोणतीही भाषा त्याच्या बरोबरीची नाही, असे मानले जाते.
- संस्कृत ही प्राचीन भाषा असून त्यात अनेक साहित्य रचले गेले आहेत. याबाबतीत कसलीही शंका नाही. परंतु, अशी समज करण्यात आला आहे की संस्कृत वेदांचे पठण केल्यानंतरच देव प्रार्थना ऐकतो. वास्तविक, लोक बोलत असलेली प्रत्येक भाषा देवाची भाषा आहे.
- भाषा अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत. एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत भाषेतून ज्ञान पोहोचले आहे. त्यामुळे सध्याच्या भाषेत सुधारणा होऊ शकते. परंतु, कोणतीही भाषेची निर्मिती होऊ शकत नाही.





















































