
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अंधांना चलनातील नोटा ओळखण्यास होत असणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आता मोबाईल फोनवर आधारित उपकरण आणण्याच्या तयारीत आहे.
अंधांच्या सोयीसाठी सध्या 100 रुपये आणि त्यापेक्षा अधिक मूल्यांच्या नोटांवर इंटाग्लियो प्रिंटिंगवर आधारित खुणा असतात. मात्र 10, 20, 500, 100, 200, 500, 2000 अशा सर्वच नोटा चलनात आहेत. त्यामुळे अंधांना सर्व नोटा ओळखण्यात अडचण निर्माण होत आहे. जून 2018 मध्ये आरबीआयने अंधांसाठी विशेष उपकरण किंवा यंत्रणा विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता उपकरण बनवणाऱया वेंडर्सकडून अर्ज मागवले आहेत. त्यासाठी आरबीआयने निविदा काढली आहेत. नोटांचे मूल्य ओळखू शकेल, असे हाताने चालणारे उपकरण असावे, असे निविदेत म्हटले आहे. या उपकरणासमोर नोटा धरल्या की दोन सेकंदांत त्याचे मूल्य वाचले जाईल.सॉफ्टवेयर आधारित उपकरण हाताळायला सोपे, बॅटरीवर चालणारे, लहान असेल.
देशात सुमारे 80 लाख अंध आहेत. हिंदुस्थानने जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार अंधांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याखेनुसार जी व्यक्ती तीन मीटरच्या अंतरावरून बोटे मोजू शकत नाही ती अंध. यापूर्वी जी व्यक्ती सहा मीटरवरून हाताची बोटे मोजू शकत नाही ती अंध अशी व्याख्या होती. 1976 सालापासून अंधांची ही व्याख्या हिंदुस्थानने स्वीकारली होती.

























































