नुपूर शर्मा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडली, 117 निवृत्त अधिकाऱ्यांचे नाराजीचे पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढले होते. मात्र याविरोधात देशातील 117 निवृत्त अधिकाऱ्यांनी पत्र प्रसिद्ध करत नाराजी व्यक्त केली आहे. यात 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त सनदी अधिकारी आणि 25 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चासत्रादरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर त्यांच्याविरोधात संतापाचा उद्रेक झाला आणि अनेक ठिकाही हिंसक आंदोलनेही झाली. त्यांच्याविरोधात देशातील अनेक भागांमध्ये गुन्हे दाखल झाले. ही सर्व प्रकरण एकत्रित करून त्यांची दिल्लीमध्ये सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती. मात्र त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने नुपूर शर्मा यांना खडे बोल सुनावले होते.

देशातील 117 निवृत्त अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांना खुले पत्र लिहिले आहे. निवृत्त अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत नुपूर शर्मा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडल्याचे म्हटले. या पत्रामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत निवृत्त होईपर्यंत त्यांचे रोस्टर मागे घेण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच नुपूर शर्मा प्रकरणातील सुनावणीदरम्यान त्यांनी केलेली टिप्पणी आणि आदेश मागे घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

नुपूर शर्माचे मुंडके धडावेगळे करणाऱ्याच्या नावावर संपूर्ण संपत्ती करणार, सलमानची घोषणा

काय म्हणाले होते न्यायालय?

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुपूर शर्मा यांना कठोर शब्दामध्ये फटकारले होते. या महिलेच्या सैल जिभेमुळे देशभरात भडका उडाला आहे. देशात जे काही सुरू आहे त्याला केवळ ही महिला जबाबदार असून सत्ता आपली आहे म्हणून आपण काहीही बोलू शकतो असे या महिलेला वाटते. नुपूर शर्माने संपूर्ण देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले. शर्मावर कारवाई न करणाऱया दिल्ली पोलिसांवरही न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.