
>> प्रकाश एदलाबादकर
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वासुदेवकाका चोरघडे गेले. नागपूरच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील शेवटचा आधारवड कायमचा कोसळला. येथील साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्राला ज्या व्यक्तींच्या ज्ञानसाधनेने, लोकाभिमुखतेने आणि सौजन्यपूर्ण निगर्वी स्वभावाने एक उंची दिली त्या पिढीचे वासुदेवराव चोरघडे हे शेवटचे प्रतिनिधी. ‘ही वॉज लास्ट ऑफ द रोमन्स’!
डी.ए.जी.पी.टी.सारख्या लेखा आणि जोखा सांभाळणार्या सरकारी कचेरीत वासुदेव चोरघडे ऊर्फ काकांची हयात गेली. रुक्ष आकडेवारीच्या त्या जगातही काकांनी हिशेब जुळवला तो आयुष्याचा. दुःखाना निःशेष करून सदैव आनंदाचा गुणाकार आणि समाधानाची बेरीज केली. पुत्रवियोगाच्या दुःखाचे हालहाल त्यांनी पचविले. प्रज्ञाभारती आचार्य श्रीधर भास्कर वर्णेकरांसोबत एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या कारला जीवघेणा अपघात झाला. त्यात प्रज्ञाभारतींचा मृत्यू झाला आणि काकांचा पाय जायबंदी झाला.
काकांचे मूळघराणे नरखेड या गावचे. देवाजीपंत चोरघडे हे काकांचे पूर्वज, पेशवाईमधील साडेतीन शहाण्यांमधील एक पूर्ण शहाणे. नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील थोर मुत्सद्दी असा देवाजीपंतांचा लौकिक होता. असा संपन्न वारसा लाभलेले काकांचे घराणे आहे. मराठी कथासाहित्याला वेगळे वळण देणारे प्रसिद्ध कथाकार वामन कृष्ण चोरघडे हे काकांचे बंधू. काका सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती यांचे भक्त, शिष्य आणि उपासक होते. स्वामींच्या साहित्याचा त्यांनी केवळ मूलाग्राही अभ्यासच केला नाही तर आयुष्यभर व्यासंग केला. वेद-उपनिषदांच्या चिंतन, मनन आणि अभ्यासातून त्यांच्या प्रज्ञेला परतत्त्वाचा स्पर्श झालेला होता. त्यांच्या प्रासादिक आणि रसाळ वाणीतून याचा प्रत्यय वारंवार येत असे. या ज्ञानोपासनेतूनच काका ज्ञानसाधक झाले. आपण जे बोलतो ते आचरणातही आणले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे. म्हणूनच त्यांना ‘ज्ञानसाधू’ ही उपाधी सर्वस्वी शोभून दिसे. संस्कृतातील आचार्य परंपरेतून प्राप्त केलेले संचित आणि संतसाहित्यातून मिळवलेले वात्सल्याचे दान यांचा एक अपूर्व असा संगम त्यांच्या वाणीत आणि लेखणीत झाला होता. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक प्रवचनात भक्ती-भावार्थाची गंगा प्रवाहित होत असे. त्यांची वाणी श्रवण केल्यावर आपण आंतर्बाह्य शुचिर्भूत झाल्याचा अनुभव येत असे.
काकांच्या संपूर्ण जीवनाला सुसंस्कृतपणाचे आणि अध्यात्माचे अधिष्ठान होते. काका आध्यात्मिक होते, परंतु कर्मकांडी नव्हते. संतसाहित्य असो किंवा वेदोपनिषद असो त्यावर बोलताना ते नेहमी सध्याच्या समकालीन वास्तवाशी त्याची सांगड घालत. आजच्या काळातदेखील हे प्राचीन तत्त्वज्ञान किती प्रकर्षाने लागू आहे हे ते सांगत. मानवीय शाश्वत मूल्याचे नेमके आणि नेटके दर्शन त्यांच्या विवेचनात असे. समाजधारणा आणि व्यक्तीची जडणघडण याबाबत त्यांची मते आग्रही असत, परंतु ती मांडताना त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा केला नाही. त्यांचा पिंड मुळातच भक्तियुक्त होता. त्यामुळे त्यांची कथनशैली रसाळ असे. ज्ञानदेव, एकनाथ, तुकारामबुवा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांच्या साहित्यातील चपखल उदाहरणांनी ते श्रोत्यांना अंतर्मुख करीत. वासुदेवकाका म्हणजे एक चालताबोलता ज्ञानकोश होते. अध्यात्माच्या क्षेत्रात वावरणारी व्यक्ती साधारणपणे स्वतःभोवती एक कोष निर्माण करणारी असते. जनसंपर्क टाळण्याकडे त्यांचा कल असतो, परंतु काका याला अपवाद होते. नागपूर, विदर्भच नव्हे तर सार्या मराठी जगताशी त्यांचा संबंध होता. अनेक साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा क्रियाशील संबंध होता. बोलण्या-वागण्यात आपपरभाव नसल्याने विविध विचारसरणीची मंडळी त्याच्या मित्रांमध्ये होती. विदर्भ साहित्य संघाचे ते एकेकाळी चिटणीस होते. त्यांचे रंगभूमीवरही तेवढेच प्रेम होते. नागपूर साहित्य सभा या संस्थेद्वारे त्यांनी काही नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन तर केले होतेच, परंतु त्यात भूमिकाही केल्या. त्यांनी त्याकाळी केलेल्या ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकात आजच्या आघाडीच्या कथा-कादंबरीकार आशा बगे यांनी प्रमुख भूमिका केली होती. पु. ल. देशपांडे लिखित ‘पूर्वज’, ‘तसेच आख्ययिका कालिदासम’, ‘गुरुप्रसादम’ या संस्कृत नाटकातूनही त्यांनी अभिनय केला होता.
डीएजीपीटी कार्यालयाच्या ज्युबिलीप्रसंगी त्यांनी ‘नागपूर दर्शन’ हा कार्यक्रम सादर केला होता. आकाशवाणीसाठी त्यांनी 1961 पासून जवळपास 45 नभोनाट्ये लिहिली. 90 नभोनाट्यांतून कामे केली. नागपूरच्या तत्कालीन नाटय़क्षेत्रातील रंगकर्मींशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी नागपुरात कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या शीर्ष सभेचे ते अध्यक्ष होते. आचार्य विनोबा भावेंपासून प्राचार्य राम शेवाळकरांपर्यंत आणि स्वामी गोविंद गिरी महाराजांपासून बाबामहाराज सातारकरांपर्यंत सर्वांशी काकांचे सलोख्याचे संबंध होते. काका म्हणजे सर्व समावेशकतेचा आदर्श होते यात मुळीच शंका नाही. काकांना आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले, परंतु त्याचा बडिवार त्यांनी माजविला नाही. त्यांचा वेशही साधा असे. असे साधेपण आणि अशी विद्वत्ता क्वचितच दिसते. आज समाजाचे वातावरण गढूळलेले आहे. सर्वसामान्य माणूस संभ्रमावस्थेत आहे. त्याला नेमकी दिशा कळत नाही. सारा समाज केवळ आणि केवळ पैशाभोवती फिरतोय. व्यक्ती-व्यक्तीमधील संवादच संपत चालला आहे. एक निराशा आणि उद्विग्नता मनीमानसी थैमान घालत आहे. सामान्य प्रापंचिकांचा ‘अर्जुन’ झालेला आहे. अशाप्रसंगी समाजधारणा आणि मूल्यप्रतिष्ठा पुन्हा समाजात रुजवू बघणार्या वासुदेवकाका चोरघडे यांच्यासारख्यांचे असणे खूप मोलाचे असते, मात्र आता वासुदेवकाका अनंताच्या प्रवासाला निघून गेले. मानवी आयुष्यातील अंधारवाट उजळणारा हा दीपस्तंभ सदैव स्मरणात राहील!































































