मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी घेतलेले ‘शिलेदार’ डॉ. सु. र. देशपांडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सरोजकुमार सदाशिव मिठारी 

इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि भाष्यकार अशी डॉ. सु. र. ऊर्फ सुरेश रघुनाथ देशपांडे यांची ओळख असली तरी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीसाठी सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत वाहून घेतलेले ‘शिलेदार’ हा त्यांचा अधिक चपखळ परिचय म्हणता येईल. ‘भैयासाहेब’ या टोपण नावाने ओळखले जाणारे डॉ. सु. र. देशपांडे यांचा मध्य युगीन इतिहासाबरोबरच मराठेशाहीचा व्यासंग आणि अभ्यास दांडगा होता. यादव स्कल्प्चर (इंग्रजी), मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, भारतीय गणिका, सरस्वती दर्शन, पेशवेकालीन पुणे, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, प्राचीन भारतीय शिल्पवैभव, भारतीय कामशिल्प, मराठेशाहीतील मनस्विनी, वाई : कला आणि संस्कृती आदी 17 पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला. तसेच त्यांची अनेक पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्यास सूचीत समाविष्ट झाली.

मराठी विश्वकोशात हजारो नोंदींचे लेखन-समीक्षण त्यांनी केले. ‘Love in Stone’ हे त्यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले इंग्रजी पुस्तक. गोवा राज्यातील मराठी विश्व चरित्र कोशातही त्यांनी सन्माननीय लेखक, संपादक आणि सल्लागार म्हणून काम केले. याशिवाय आकाशवाणीसह विविध प्रसिद्ध नियतकालिकांतून प्रसंगोपात स्फूट लेखन केले. डॉ. सु. र. देशपांडे यांचा जन्म कागल येथील. ज्येष्ठ इतिहासकार रावबहादूर डी. बी. पारसनीस हे त्यांचे मातुल आजोबा. भैयासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथून घेतल्यानंतर ‘यादव शिल्पशैली’ या प्रबंधावर त्यांनी डेक्कन कॉलेज, पुणे येथून पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर त्यांनी 1959-64 पर्यंत शिक्षक, प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोशात नोकरीस सुरुवात केली आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली. 1964 ते 2018 म्हणजे अगदी अखेरपर्यंत म्हणजे 54 वर्षे त्यांनी मराठी विश्वकोश निर्मितीला वाहून घेतले. मराठी विश्वकोशाच्या 1 ते 20 खंडांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही सहसंपादक, विभाग संपादक ही पदे लीलया पेलली.

मराठी विश्वकोशात आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून मे. पुं. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड ते विद्यमान प्रमुख संपादक दिलीप करंबेळकर यांच्यापर्यंत त्यांनी लेखन, संपादनाचे काम अव्याहत केले. वयाच्या 82 व्या वर्षीही तरुणाला लाजवील अशी त्यांची दररोज सलग आठ तास अभ्यासाची बैठक आणि काम करण्याची पद्धत होती. सामान्यांपासून थोरांपर्यंत सर्वांमध्ये ते सहज मिसळत. 2011 मध्ये रुजू झालेल्या आम्हा सर्व तरुण संपादकांना त्यांनी सहज आपलेसे करून नेहमी मार्गदर्शन केले. प्रेमळ स्वभाव, नेहमी मदतीची तयारी, उंच व देखणी शरीरयष्टी, सडपातळ बांधा, सतत उत्साही व हसरा चेहरा ही भैयासाहेबांची बलस्थाने होती.

इतिहासकार कसा असावा याबद्दल ते म्हणतात, ‘‘खरा इतिहासकार हा मला वाटते, माझ्या मते अशा अतर्क्य व दोलायमान भूमिकेत नसतो, तर तो ऐतिहासिक साधनांचा योग्य वापर करून आपले स्पष्ट मत नोंदवत असतो.’’ भैयासाहेब आयुष्यात नेहमी स्पष्ट भूमिकेत जगले. प्रसिद्धीपासून दूर राहून या इतिहासकाराने हिंदुस्थानी प्राचीन, मध्ययुगीन व मराठेशाही यांची जी मांडणी केली ती इतिहासप्रेमींसह सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. ‘मराठेशाहीतील मनस्विनी’ हे पुस्तक म्हणजे मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे सोनेरी पान ठरेल. ज्येष्ठ इतिहासकार ग. ह. खरे हे त्यांचे मार्गदर्शक, तर ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव त्यांचे वर्गमित्र.

इतिहासाबरोबर ज्योतिष व हस्तरेषांमधील त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा होता, पण कर्मकांडे त्यांना मान्य नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवा महाले यांच्या वारसदारांनी स्वतः काही दस्तऐवज, जुनी कागदपत्रे भैयासाहेब यांच्याकडे अभ्यासासाठी आणून दिली होती. हे कळताच काही इतिहास अभ्यासकांनी हे ऐवज आपल्याकडे देण्यासाठी भैयासाहेब यांच्याकडे तगादा लावला. तथापि या दस्तऐवजांचे खासगीकरण भैयासाहेबांना मान्य नव्हते. हा स्वराज्याचा ठेवा असलेले सर्व दस्तऐवज त्यांनी जिवा महाले यांच्या वंशजांच्या संमतीने कोल्हापूरच्या शासकीय पुराभिलेखागारात जमा केले. तेथील रुमालामध्ये हे दफ्तर आजही सुरक्षित आहे हे भैयासाहेब मोठ्या अभिमानाने सांगत. त्यांच्या निधनाने इतिहासाचा व्यासंगी भाष्यकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.