
गणपती विसर्जनानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानाचा पारा वाढू लागला असून आता ऑक्टोबर हीटचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे एसी, पंख्यांचा वेग वाढल्याने राज्याची विजेची दैनंदिन मागणी तब्बल 26 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. आठवडय़ापूर्वी 20 हजार मेगावॅटच्या जवळपास अडखळणाऱया विजेच्या मागणीत सुमारे पाच हाजार मेगावॅटची मोठी वाढ झाल्याने सर्वच वीज कंपन्यांनी आपली वीजनिर्मिती वाढवली आहे.
पावसाळय़ात म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत महावितरणकडे दररोज 17 हजार मेगावॅटच्या जवळपास विजेची मागणी नोंदली जात होती, तर मुंबईत 2500-2700 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात होती. मात्र पावसाने उसंत घेताच तापमानात झापाटय़ाने वाढ झाली असून तापमान 32 अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत मुंबईसह राज्यातील विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. राज्यभरातून महावितरणकडे आज 22 हजार 610 मेगावॅट एवढी मोठी मागणी नोंदली असून ती गेल्या चार महिन्यांतील उच्चांकी ठरली आहे, तर मुंबईत आज अनेक कार्यालयांना सुट्टी असतानाही 3210 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली. महावितरणने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून 7 हजार 595 मेगावॅट, खासगी वीज कंपन्यांकडून 7 हजार 515 मेगावॅट, तर 7 हजार 595 मेगावॅट वीज पॉवर एक्स्चेंजमधून घेतली आहे. मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी एक्स्चेंजमधून 1975 वीज घेतली आहे.
पॉवर एक्स्चेंजमधील वीज कडाडली
ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेच्या मागणीत अल्पावधीत झपाटय़ाने वाढ झाली असली त्या प्रमाणात वीज केंद्रांमधून वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे महावितरणसह इतर राज्यांतील वीज कंपन्यांनी आयत्या वेळी पॉवर एक्स्चेंजमधून वीज खरेदीची मागणी नोंदली आहे. त्यामुळे एरवी दीड-दोन रुपये प्रतियुनिट दराने मिळणाऱया विजेचा दर आज काही काळासाठी पाच रुपयांपर्यंत वाढला आहे. यावरून संपूर्ण देशभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.


























































