मंत्र्यांनो, दरमहिन्याला ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना बिजू जनता दलाच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कार्याचे दरमहा ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करावे, असे बजावले आहे. एका अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने दरमहिन्याच्या 7 तारखेला प्रत्येक मंत्र्याने रिपोर्ट कार्ड सादर करावे, असे स्पष्ट केले आहे. नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक 29 मे रोजी झाली. या बैठकीत बिजू जनता दलाच्या जाहीरनाम्याची पुढील पाच वर्षांत अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. विहित कालावधीत प्रकल्प व कामे पूर्ण करण्यावर मंत्र्यांनी भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पूर्वीच्या सरकारच्या ‘फोर टी’ फॉर्म्युलामध्ये त्यांनी यावेळी ‘टाइम’चा समावेश केला. टीमवर्क, टेक्नॉलॉजी, ट्रान्स्परन्सी आणि ट्रान्स्फॉर्मेशन हा पूर्वीचा फॉर्म्युला होता.