लोकसभा निवडणुकीत 33 टक्के महिलांना तिकीट देणार : नवीन पटनायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

आगामी लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दल 33 टक्के महिलांना तिकीट देणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे. केंद्रपाडामध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. याआधीही पटनायक यांनी महिलांना 33 टक्के आरक्षणाचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. ओदिशामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत.

केंद्रपाडातील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली. महिलांना राजकारणात प्रतिनिधीत्व देण्यासाठी पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रपाडामध्ये ही घोषणा केल्यानंतर समाधान मिळत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याआधाही पटनायक यांनी लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिलांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महिला सक्षम आहेत आणि राष्ट्र निर्माणात त्या महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, हे सिद्ध करण्यासाठी ओदिशाने पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओदिशा विधानसभेचा कार्यकाल संपत असल्याने तेथे लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पटनायक यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.