मोदींना वचनाची आठवण करून द्यायला तो चालला हजार किलोमीटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

२०१४च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने मोदींसोबत अच्छे दिन येणार असं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता पुढची निवडणूक आली तरी त्या अच्छे दिनचा काही पत्ता न लागल्यामुळे एकाने हजार किलोमीटर चालत मोदींचं घर गाठायचा निश्चय केला आहे.

मुक्तिकांत बिस्वाल (३०) असं या व्यक्तीचं नाव असून ते व्यवसायाने मूर्तिकार आहेत. बिस्वाल हे मूळचे ओडिशा येथील राउरकेलाचे रहिवासी आहेत. राउरकेला या गावात सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. विशेषतः या गावात एकच रुग्णालय असून त्यातही सुविधांची वानवा असल्याने अनेक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या अशा परिस्थितीमुळे अनेक जणांना शेकडो मैल दूरचा प्रवास करून शहरांमध्ये खर्चिक उपचार घ्यावे लागत आहेत.

याबाबत आरोग्य मंत्रालयाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उत्तर मिळत नसल्याने त्यांनी आता सरळ पंतप्रधानांना भेटण्याचा निश्चय केला आहे. यासाठी त्यांनी राउरकेला ते आग्रा हे १ हजार ३५० किलोमीटरचं अंतर पायी कापलं आहे. आग्रा येथे पोहोचल्यानंतर अशक्तपणामुळे त्यांना त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आपण जोपर्यंत पंतप्रधानांना भेटत नाही, तोपर्यंत हा प्रवास सुरू ठेवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. ४ वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचं जे वचन दिलं होतं, ते पूर्ण कधी करणार आहेत? हे विचारण्यासाठी मी दिल्ली गाठणार आहे आणि ग्रामस्थांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे, असं बिस्वाल यांचं म्हणणं आहे.