
सामना प्रतिनिधी । परंडा
रोहयो अंतर्गत कामावरील १६ लाख ९ हजार ८७९ रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी परंडा तहसिल कार्यालयाच्या तत्कालीन तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील यांच्यावर दि २ जानेवारी रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परंडा तहसिल कार्यालयात रोहयो अंतर्गत कामावरील रक्कमेच्या अपहार प्रकरणी उपविभागीय आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समीती नेमून चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता परंडा तहसिल कार्यालयात कार्यरत असताना तत्कालीन तहसिलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी सन १८ जुन २०११ ते ४ जुन २०१३ या कालावधीत रोहयो अंतर्गत कामाची रक्कम १६ लाख ९ हजार ८७९ रुपये रोख वहित कमी नोंदवुन सबंधीतांना जादा प्रदान करून रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशी समीतीच्या वतीने केल्याच्या चौकशीत आढळून आले.
चौकशी समितीचा अहवाल १६ ऑगष्ट २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील प्रस्ताव संभाजीनगरच्या आयूक्ताकडे सादर केल्याने चौकशी अहवाला नुसार कारवाईचे आदेश देण्यात आल्याने तहसिलदार आनिल कुमार हेळकर यांच्या फिर्यादी वरून भांदवी कलम ४०६, ४०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. उप निरिक्षक माने हे करीत आहेत.



























































