
वृद्ध दाम्पत्याचा खून करून 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या तिघा दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील आपेगाव शिवारात ही घटना घडली होती.
अजय छंदू काळे (वय 19), अमित कागद चव्हाण (वय 20), अजय चंदू काळे (वय 22, रा. पढेगाव, ता. कोपरगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75), राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) अशी मृत वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. मृताचा मुलगा जालिंदर दत्तात्रय भुजाडे (रा. वाकी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
शेतातील विहिरीचे काम महिनाभर सुरू असल्याने भुजाडे हे या कारागीरांना सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी बँकेतून पैसे आणून त्यांचा पगार देत असत. त्यामुळे भुजाडे दाम्पत्य हे घरात एकटे राहत असल्याचे आणि त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते. त्यानुसार आरोपींनी शेतीच्या विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच तब्बल एक महिन्यानंतर सोमवारच्याच दिवशी भुजाडे दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकून त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या.
पोलीस निरीक्षक कटके यांनी गुन्हे शाखेची तीन पथके नेमली होती. गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहिती घेतली होती. दरम्यान, हा गुन्हा अजय काळे याने साथीदारांसह केला असून, तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी अजय काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध दुखापतीचा 1 गुन्हा दाखल आहे. आरोपी अमित चव्हाण हाही सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध नगर व संभाजीनगर जिल्ह्यात घरफोडी व दुखापत करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी जंतेश काळे याच्यावर जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

























































