बँकेत गेलेल्या निराधार वृद्धाचा गर्दीत गुदमरून मृत्यू

39

सामना प्रतिनिधी, साखरखेर्डा

भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ८० वर्षीय निराधार वृद्धाचा गर्दीत गुदमरून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. बँकेच्या बेजबाबदारपणाने हा बळी घेतल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

साखरखेर्डा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. सरकारी अनुदानाचे पैसे जमा होत असल्यामुळे या शाखेत नेहमीच गर्दी असते. आज सकाळी निराधार वृद्ध, कृषी कर्जधारक, शेतकरी, पेंशनधारक, पगारधारक कर्मचारी बँक उघडण्याचीच वाट पाहत होते. अकरा वाजता बँक उघडताच एकच झुंबड उडाली. नामदेव मारुती फुंडगे (८०) हे निराधार योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. बँकेत एवढी गर्दी झाली होती की कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. बँकेत जाणे आणि बाहेर निघणेही दुरापास्त झाले होते.

बँक कर्मचाऱ्यांची टंगळमंगळ
बँकेत आलेल्या वृद्धांना ताटकळत ठेवून बँकेचे कर्मचारी खुशाल टंगळमंगळ करत होते. नामदेव फुंडगे हे सकाळी ११ वाजता रांगेत लागले. तब्बल दोन तास रांगेत उभे राहूनही त्यांचा नंबर आला नाही. बँकेतील गर्दी, आतील उष्ण वातावरण यामुळे गुदमरून ते कोसळले. उपस्थितांनी तातडीने फुंडगे यांना खासगी रुग्णालयात हलवले. परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना चिखली येथे पाठवण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी तपासून फुंडगे यांना मृत घोषित केले. सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
साखरखेर्डा येथील स्टेट बँकेच्या शाखेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. बँकेत येणाऱ्या वृद्धांची तर भयंकर आबाळ होते. कर्मचारी बेशिस्त असल्यामुळे ग्राहकांना किरकोळ कामासाठीही तासन् तास बसवून ठेवण्यात येते. कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यास ग्राहकांनाच पोलिसांची धमकी देण्यात येते. त्यामुळे बँक कर्मचारी, अधिकारी यांच्या बेजबाबदारपणाचा हा बळी असून त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सैनिक परमानंद फुंडगे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या