
उरण तालुक्यातील कोप्रोली गावात सोमवारी संध्याकाळी ७च्या सुमारास घराला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत अर्जुन धर्मा म्हात्रे (61) या वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सदर वृद्धावर उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे.
मयत अर्जुन धर्मा म्हात्रे यांचे धाकटे बंधू काशिनाथ म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की, आमचे थोरले बंधू अर्जुन धर्मा म्हात्रे हे ब्रम्हचारी म्हणून आपले जीवन जगत होते. कोप्रोली ग्रामपंचायतीने त्यांना सन 2005-06 या वर्षी इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुल बांधून दिले होते. त्यामुळे ते त्याच घरात वास्तव्य करत होते. घरात लाईट नसल्याने डास पळवून लावण्यासाठी त्यांनी शेणाची धुरी केली होती आणि ते झोपी गेले होते. दरम्यान, या धुरीच्या आगीमुळे घराला आग लागली आणि त्यात ते होरपळून ठार झाले. शेजारी आणि त्यांच्या नातेवाईकानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काशिनाथ म्हात्रे यांना वाचविण्यात यश आले नाही. या प्रकरणी उरण पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































