ऑलिम्पिकमध्ये चीनचा रडीचा डाव; गलवान संघर्षातील जखमी कमांडरच्या हाती दिली मशाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमेवर घुसखोरी करणाऱया चीनने आता बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतही आगळीक केली आहे. गलवान खोऱयातील संघर्षात जखमी झालेला कमांडर क्यूई पैबाओ याच्या हाती चीनने मशाल दिली. या घटनेचा तीव्र निषेध करीत हिंदुस्थानने चीनला प्रत्युत्तर दिले आहे. बीजिंग ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोपाच्या समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑलिम्पिकमध्येही चीनकडून रडीचा डाव खेळला जात आहे. या मुद्दय़ाकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत लक्ष वेधले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुस्थानची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

‘त्या’ कमांडरचे डोके फोडले होते

15 जून 2020 रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी घुसखोरी केली. हिंदुस्थानी जवानांनी ही घुसखोरी रोखली आणि चिनी सैनिकांना जशास तसे उत्तर दिले. यात चीनचे अनेक सैनिक ठार झाले. काही चिनी सैनिक जखमी झाले होते. त्यात कमांडर क्यूई पैबाओ याचे डोके फोडले होते. पैबाओ गंभीर जखमी झाला होता. आता त्यालाच चीन सरकारने विंटर ऑलिम्पिकचे मशालवाहक बनविले आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले

पूर्व लडाखमध्ये घुसखोरी हिंदुस्थानने नाही तर चीनने केली ही वस्तुस्थिती आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितले. गलवान संघर्षात जखमी झालेल्या कमांडरच्या हाती ऑलिम्पिक मशाल देऊन त्याचा गौरव करून हिंदुस्थानला खिजवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. जखमी झालेल्या कमांडरला जगापुढे आणून चीनकडून धूळफेक केली जात आहे. हिंदुस्थानच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे.