
हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघांनी अखेर सोमवारी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळविला. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत अपयशी ठरलेल्या देशांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिल्याने हिंदुस्थानचे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या जागतिक तिरंदाजी क्रमवारीनंतर हिंदुस्थानी सघांची ऑलिम्पिकवारी पक्की झाली.
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. हिंदुस्थानी तिरंदाज ऑलिम्पिकमध्ये पाच पदकांसाठी (पुरुष व महिला संघ, वैयक्तिक व मिश्र प्रकारात) काwशल्य पणाला लावतील. क्रमवारीच्या आधारावर पुरुष गटात हिंदुस्थान व चीन या देशांनी ऑलिम्पिक कोटा मिळविला. महिला गटात हा कोटा हिंदुस्थान व इंडोनेशियाला मिळाला. ऑलिम्पिकमध्ये 12 देश सांघिक स्पर्धेत भिडणार असून, मिश्र दुहेरीत पाच संघांमध्ये स्पर्धा रंगेल. ऑलिम्पिकच्या इतिहासात पात्र न ठरलेल्या देशांमधील अव्वल संघांना ऑलिम्पिक कोटा देण्याची ही पहिलीच वेळ होय.
तरुणदीप, दीपिकाची चौथी ऑलिम्पिकवारी
तरुणदीप रॉय व दीपिका कुमारी हे अनुभवी तिरंदाज चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 40 वर्षीय तरुणदीपने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये, तर दीपिकाने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते. धीरज बोम्मदेवरा, अंकिता भकत व भजन कौर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील, तर प्रवीण जाधवचे टोकियोनंतर हे सलग दुसरे ऑलिम्पिक असेल.
हिंदुस्थानी संघ
n पुरूष संघ ः तरुणदीप रॉय, धीरज बोम्मदेवरा, प्रवीण जाधव.
n महिला संघ ः दीपिका कुमारी, भजन कौर, अंकिता भकत.

























































