
कर्जाची रक्कम थकवल्याने बँकेने सील केलेल्या कंपनीमधून एक कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या चोरटय़ाचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे एका सरकारी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. काही वर्षांपूर्वी बँकेने सिप्झ येथील एका दागिने बनवणाऱ्या कंपनीला काही कोटींचे कर्ज दिले होते. ते कर्ज कंपनीने फेडले नव्हते. 2019पासून ती कंपनी बंद आहे. बँकेने दागिने बनवणाऱ्या कंपनीला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सील केले होते. कंपनीच्या चार मजली इमारतीत काही दागिने आणि हिरे सील करून ठेवले होते. त्या इमारतीची देखरेख करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात होता.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी बँकेचे मॅनेजर हे त्या इमारतीजवळ आले. तेव्हा त्या इमारतीच्या तळ मजल्यावरील सील लावलेले लॉक उघडलेले दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदार हे वर गेले. तेव्हा त्याना हिरे जागेवर दिसले नाहीत. हिरे चोरीची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरटय़ाचा शोध घेत आहेत. तपासासाठी खास पथक तयार केली असून याचा समांतर तपास क्राईम ब्रँच करत आहेत.





























































