कफपरेड येथे गरिबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कफपरेड येथील मच्छीमार नगरमध्ये भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया एका कुटुंबाने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. प्रवीण पटेल (४०), रीना पटेल (३६) आणि त्यांचा मुलगा प्रभू पटेल (११) अशी तिघांची नावे आहेत. आत्महत्येपूर्वी प्रवीणने १० ते १२ पानांची चिठ्ठी लिहिली असून त्यात आठ वर्षांच्या मुलीचा ब्लड कॅन्सरने मृत्यू, कमालीची आर्थिक चणचण आणि काही शेजाऱयांची रोजची भांडणे यामुळे हे जग सोडून जात असल्याचे म्हटले आहे.

मच्छीमार नगर क्रमांक ४ मध्ये प्रवीण पत्नी आणि दोन मुलांसह सात ते आठ वर्षांपासून राहत होता. ज्या खोलीत भाडय़ाने राहत होता त्या खोलीमालकाचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे प्रवीण इलेक्ट्रिशन म्हणून काम करीत होता. शुक्रवारी दुपार झाली तरी प्रवीणच्या घरचा दरवाजा बंद होता. शेजाऱयांनी ठोकूनही दरवाजा कोणी उघडत नसल्याने त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. कफपरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला त्यावेळी प्रवीण, रीना आणि प्रभू गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले पण दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

मच्छीमार नगरमधील शेजारी आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण आणि रीना यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे दोघांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. शेजाऱयांशीही ते फारसे मिळूनमिसळून नव्हते. दरम्यान, तिघांनी एकाच वेळी फाशी लावली की प्रवीणने दोघांना आधी मारले आणि नंतर स्वतः गळफास घेतला हे शवविच्छेदन अहवालानंतर सांगता येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी सांगितले.

प्रतिभा गेली तिथेच संपलं!
आत्महत्येपूर्वी प्रवीणने मुलाच्या वहीवर १० ते १२ पाने चिठ्ठी लिहिली आहे. माझ्या आठ वर्षांच्या प्रतिभा हिला ब्लड कॅन्सरने ग्रासले. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले पण ती वाचली नाही. पैसा गेला आणि प्रतिभाही गेली तिथेच सर्व संपले. अनेकांकडून पैसे कर्ज म्हणून घेतले. ते फेडताना आणि कुटुंब चालवताना माझे नाकीनऊ येत आहेत. त्यात काही शेजारी विनाकारण त्रास देत आहेत. त्यामुळे आम्ही कायमचे हे जग सोडून जात आहोत असे या चिठ्ठीत प्रवीणने लिहिले आहे. विशेष म्हणजे चिठ्ठीच्या शेवटी त्याने कुटुंबाचा फोटो लावला असून बाजूला सही केली आहे.