
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुर्ला पश्चिम येथे शुक्रवारी सकाळी बेस्टच्या दोन बसगाडय़ांमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या विचित्र अपघातात आमरीन सबा मुतुजा शेख (२२) ही तरुणी ठार झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. बसचालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्ला पश्चिम येथील बेस्ट बस स्थानकात सकाळी बेस्टची ३२० क्रमांकाची बस रिकामी उभी होती. त्या बसच्या मागेच आणखी एक रिकामी बस उभी होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास पुढील बसच्या चालकाने बस सुरू केली. त्याचवेळी आमरीन सबा मुतुजा शेख ही तरुणी दोन बसच्या मधून जात होती. गाडीत वाहक नसतानाही चालकाने बस मागे नेली. त्यातच अचानक बस मागे आल्यामुळे ही तरुणी दोन्ही बसच्या मधल्या फटीत अडकली आणि चिरडली गेली. ही दुर्घटना बसचालकाच्या लक्षात येईपर्यंत ही तरुणी जबर जखमी झाली होती. तिला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. पूनम राठोड यांनी सांगितले. बेस्ट बसचालक संजय गणपत पवार (५१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































