
सामना प्रतिनिधी । नांदेड
सहस्त्रकुंड परिसरात वनविभागाने निर्माण केलेल्या ग्रीन गार्डनच्या मागील तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव सौरभ राठोड असून त्याचे वय अवघे 18 होते. सौरभ सेल्फी काढण्यासाठी गेला होता तेव्हा तो बुडाला अशी माहिती समोर आली आहे.
यंदा झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा चांगलच वाहत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सायरन बसविले आहे. परंतु याच धबधब्याच्या शेजारी असलेल्या ग्रीन गार्डनमागील तलावाजवळ कोणताही बांदोबस्त नसल्याने येथे सेल्फी काढण्यासाठी अनेक पर्यटक जात आहेत. किनवट तालुक्यातील रोड नाईक तांडा, वाळकी बु.येथील सरपंच प्रकाश राठोड यांचा मुलगा काही मित्रांसमवेत गार्डनमध्ये गेला होता. गार्डन फिरून झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पाठीमागे असलेल्या तलावाजवळ सेल्फी काढत असताना अचानक तोल गेल्यानं तलावात पडला. त्यास पोहत येत नसल्याने त्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायंकाळी त्याचे प्रेत तलावातून काढण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे.



























































