कांद्यावर मावा, करप्याचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

469

महिन्यापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे गावठी कांद्याच्या लागवडी लांबणीवर पडल्याने कांद्याची रोपे पिवळी पडली होती. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकर्‍यानी कांद्याची रोपे विकत घेत लागवडी केल्या. आता दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कांद्यावर मावा, अळी व करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर महागाडी औषधे फवारण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ओढे, नाले, पाझर तलाव, विहिरी, कुपनलिका, सिमेंट बंधारे तुडुंब भरुन वाहात आहेत. यंदा मुबलक पाण्यामुळे अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकर्‍यानी गावठी कांद्याच्या लागवडी केल्या. गावठी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, म्हणून मिळेल त्या भावाने शेतकर्‍यानी कांद्याची रोप विकत घेऊन लागवडी केल्या आहेत. संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी कांदा लागवडी अजून सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून थंडीही सुरू झाली असल्याने ही थंडी कांद्यांसाठी पोषक आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका कांद्याला बसण्यास सुरुवात झाली आहे. मावा, अळी बरोबरच करप्याचाही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकर्‍यांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. नाईलाजाने शेतकर्‍यांना महागडी औषधे घेऊन ती कांदा पिकावर फवारण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरण असेच राहिले तर संपूर्ण कांद्याचे पीक वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या