स्वयंपाकघरात भडका; नो कांदे का तडका, भाजीच्या फोडणीला फक्त कांद्याचा वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या अतिपावसाचे परिणाम आता थेट स्वयंपाकघरात दिसू लागले आहेत.  भाज्या, डाळींनी चढे दर कायम ठेवले आहेत. कांद्याने शंभरी पार करून डोळ्यांना धार आणली आहे. मांसाहाराकडे वळावे तर मटण, चिकनच्या किमतींनीही रेकॉर्ड केले आहेत. स्वयंपाकघरात महागाईचा भडका झाला असून घर चालवायचे कसे, हा यक्षप्रश्न गृहिणींसमोर उभा ठाकला आहे.

या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यातच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे राज्यभरात भाज्यांच्या उत्पादनांत घट झाली. परिणामी घाऊक तसेच किरकोळ बाजारात भाज्यांची आवक घटली. आवक घटल्याने भाज्या चढय़ा भावाने विकल्या जात आहेत. भाज्यांचे दर गेल्या महिन्यापेक्षा दुपटीने वाढले आहेत.  दोन-तीन महिन्यांपूर्वी साधारणपणे ज्या भाज्या 40-60 रुपये किलो दराने विकल्या जात होत्या त्या आता 80 ते 100 रुपये किलो या दरापर्यंत पोचल्या आहेत. मेथीसारखी पालेभाजीची जुडी 40 ते 50 रुपये झाली आहे. कांद्याचे दर तर 100 ते 120 रुपये किलो झाले आहेत. त्यात थोडा दिलासा टोमॅटोच्या दराने दिला आहे. टोमॅटोचे दर 80 रुपये किलोवरून 40 रुपये इतका खाली आला आहे. डाळी आणि कडधान्याचे दरही 80 ते 100 रुपये किलो आहेत. या दरांत फारशी वाढ झालेली नसली तरी एकूणच गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. त्या अगदी तोलून  मापून भाजी विकत घेत आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला आहे.

हॉटेलातून कांदा हद्दपार

किरकोळ बाजारात कांद्याचे दर रविवारी 100 आणि 120 रुपये किलो इतके राहिले. कांद्याच्या दरात अचानक एवढी मोठी वाढ झाल्याने गृहिणी हवालदिल आहेत. काही महिन्यांपूर्वी चांगल्या प्रतींच्या कांद्याचे दर 60 रुपये किलो होते. कांद्याचे दर वाढल्याने डोसा, भजी, चाट सेंटरच्या गाडय़ांपासून थेट मोठय़ा हॉटेलपर्यंत कांदा हद्दपार झाला आहे. ओनियन उत्तपा, भेळ याता कांद्याऐवजी कोबी टाकली जात आहे. काही हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमध्ये ओनियन उत्तप्पा ही डीशच काढून टाकली आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या जेवणासोबत कांदा, लिंबू दिला जातो. त्यातील कांद्याची जागा मुळ्याने घेतली आहे. कोशिंबिरीमध्ये कांद्याच्या जागी काकडी वापरली जात आहे.

भाज्यांचे दर वाढल्याने रोजच्या जेवणाचे टेन्शन येऊ लागलेय. रोज कोणती भाजी करायची हा प्रश्न आहे. त्यातच घरातील प्रत्येकाच्या भाज्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. त्या आवडी सांभाळणे आता कठीण जातेय. पूर्वी माझ्या किचनमध्ये रोज दोन भाज्या व्हायच्या.  आता एकाच भाजीवर समाधान मानावे लागतेय.-    शर्वरी पारकर, गृहिणी

भाज्या         दर

(प्रतिकिलो रु.)

कांदे                120

गवार              120

भेंडी                80

तोंडली            120

वांगी               80

काकडी            80

कारली             80

वाटाणा           80

पापडी             60

कोबी               60

फ्लॉवर            80

सिमला मिरची  80

वाल                100

टोमॅटो             40

मेथी                50 रुपये जुडी

कोथिंबीर         50 रुपये जुडी

डाळी

मूगडाळ           80 ते 90

मसूर               80 ते 90

तूरडाळ            100

उडीद              80 ते 110

हरभरा डाळ     70 ते 80  

मांसाहार परवडेना

मटणाचे दर साधारणपणे 550-570 रुपये किलो एवढे झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी मटणाचे हेच दर 450 ते 500 रुपये किलो इतके कमी होते. ब्रॉयलर चिकन 190 रुपयांना विकली जात आहे.

मोदींच्या वाराणसीत लोन पे ओनियन

वाराणसीतील ज्वेलर्स दुकानात कांदे ठेवण्यात आले आहेत आणि चांदीचे दागिने, आधारकार्ड तारण ठेवा आणि कांदे घेऊन जा असा बोर्डच लावण्यात आला आहे. काही दुकानांच्या लॉकरमध्ये कांदे जमा करण्यात आले आहेत. वाराणसीतील समाजवादी पार्टीच्या या अनोख्या आंदोलनाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.