
वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर औषधांचा शोध घेणाऱ्या महिलेला सायबर भामटय़ाने औषध कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत खात्रीशीर वजन कमी करण्याचे औषध देण्याचे आमिष दाखवत वर्षभरात तब्बल 25 लाख 87 हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढते वजन सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठीच्या जाहिरातींनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वाढलेले वजन कमी करण्याचे उपाय अनेकांना हवे असतात. यातूनच अनेकजण वजन कमी करण्याचे उपाय शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. विविध वेबसाईटला भेट देणाऱ्यांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष असते. संबंधितांच्या बँक खात्याची माहिती घेऊन संपर्क करून आर्थिक फसवणूक करण्यात येते. अशाच प्रकारची घटना नगरमधील एका 40 वर्षीय महिलेच्या बाबतीत घडल्याचे उघड झाले आहे.
संबंधित महिलेने वजन कमी करण्यासाठी ‘इंडिया फिटनेस’ या वेबसाईटला भेट दिली. त्यानंतर सायबर भामटय़ाने फोनवरून महिलेशी संपर्क केला. कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत भामटय़ाने महिलेचा विश्वास संपादन केला. वजन कमी करण्याचे खात्रीशीर औषध देतो, असे सांगून ‘त्याने’ महिलेकडून 15 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी 2023 या काळात आरटीजीएस, गुगल-पे आणि फोन पेद्वारे 25 लाख 87 हजार 500 रुपये मागवून घेतले. एवढे पैसे जाऊनही वजन कमी झाले नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने संबंधित महिलेने बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


























































