जी ‘पॉवर’ सीएमकडे, तीच माझ्याकडे; मंत्री होताच ओमप्रकाश राजभर झाले ‘शोले’चे गब्बर सिंह

omprakash rajbhar

लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने योगी सरकारचा मंगळवारी मंत्रीमंडळ विस्कार करण्यात आला. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी चार नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभार, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार दारा सिंह चौहान, राष्ट्रीय लोकदलचे आमदार अनिल कुमार आणि भाजप आमदार सुनील शर्मा यांचा समावेश आहे. मात्र मंत्रीपदाची माळ गळ्यात पडताच ओमप्रकाश यांचा बोलघेवडेपणाही समोर आला असून त्यांनी स्वत:ची तुलना थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली आहे.

मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओमप्रकाश राजभर म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी स्वत: तिथे बसून आम्हाला शपथ दिली हे तुम्ही पाहिले असेलच. मंत्री होणारच हे देखील मी बोललो होतो आणि बनुनही दाखवले. आज जी पॉवर मुख्यमंत्र्यांकडे आहे तीच राजभर यांच्याकडेही आहे. मी शोले चित्रपटातील गब्बर सिंह आहे.”

आता कोणाच्या दबावात राहण्याची आवश्यकता नाही. जेव्हा कधी पोलीस स्थानकात जाल तेव्हा पिवळा गमछा घालून जा. पिवळा गमछा पाहून पोलिसाला माझा चेहरा आठवेल आणि थेट मंत्र्यांनी पाठवले असे सांगायचे. खरेच मंत्र्यांना पाठवले याची खातरजमा करण्यासाठी फोन करण्याची पॉवर पोलीस अधिकारी, एसपी, डीएम यांच्याकडे नाही, असेही ते म्हणाले.