कांद्याच्या शेतात अफूची लागवड, जामखेडमध्ये पावणेदोन लाखांची झाडे जप्त

कांद्याच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर उघडकीला आला आहे. पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 70 हजार रुपयांची 56 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी जामखेड पोलिसांत वासुदेव महादेव काळे (रा. काळे वस्ती, जातेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जातेगाव येथील काळे वस्तीवर एकाने कांद्याच्या शेतात अफूची झाडे लावली असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड त्यांनी पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वासुदेव काळे याने त्याच्या शेतात 56 किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किमतीची अफूची झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व झाडे जप्त केली असून, आरोपीला अटक केली आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.

हेडकॉन्स्टेबल संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, हेडकॉन्स्टेबल संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जायभाय, आबासाहेब आवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदीप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या