
मोठय़ा प्रमाणात पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्यानंतर झालेल्या इंधन दर कपातीवरून केंद्र सरकारचे मन मोठे असल्याचा गाजावाजा भाजप नेत्यांकडून केला जात असताना विरोधकांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. मन मोठं असण्यासाठी आधी मन असावे लागते. आम्हाला पाच रुपयांची नोट दाखवत आहात. किमान 25 रुपये इंधन कपात करायला हवी होती आणि त्यानंतर 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग दरवाढ केली हेसुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार का यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या संदर्भात चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने लोकांच्या महागाई संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. पण केंद्र सरकार या सर्व गोष्टींना जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून केंद्र सरकारने बेहिशेबी पैसे कमावले आणि आता फक्त पाच रुपये कमी करत आहात. 25-30 रुपये कमी केले असते तर भाजपवाले सांगतात तसे मोठे मन दिसले असते,’ असे संजय राऊत म्हणाले.
भाजप हराओ, दाम घटाओ!
भाजपला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल–डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे. जनतेला केंद्र सरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले आहेत,’ असे नवाब मलिक म्हणाले.
राज्य सरकारला इंधनाच्या दरात कपात करण्याची गरज नाही
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला इंधनाच्या दरात कपात करण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलवरील राज्य सरकारचा व्हॅट 1 रु. 80 पैसे तर डिझेलवरील 2 रु. 60 पैसे व्हॅट आपोआप कमी झाला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल 6.8 रुपये तर डिझेल 2.60 रुपयांनी स्वस्त झाल्याचे स्पष्टीकरण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहे.































































