महाराष्ट्रात चाललंय काय, गुंडाराज सुरू आहे! विरोधकांचा मिंधे सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या महाराष्ट्रात चाललंय काय, गुंडाराज, गुंडाराज… ‘शिवशाही गेली, गुंडशाही आली’, ‘शासन आपल्या दारी, गोळीबार घरोघरी’, ‘महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण’, ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडला ड्रग्जचा बाजार’, ‘वर्षा निवासस्थानी गुंडांना संरक्षण आणि आश्रय देणाऱया सरकारचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणा देत कायदा-सुव्यवस्थेवरून विधान भवनाच्या पायऱयांवर विरोधकांनी आज सकाळी नकली बंदुका हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दुसऱया पदाधिकाऱयावर केलेला गोळीबार, पत्रकारावर जीवघेणा हल्ला, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुंडांची उपस्थिती, पुण्यात वेताळ टेकडीवर दोघा अल्पवयीन मुलींचा नशेतला व्हिडीओ यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज याचे पडसाद उमटले. अत्याचार, बलात्कार, खुनाच्या आणि दररोज गोळीबाराच्या नवीन घटना वाढीस लागल्या आहेत. गृह विभाग, पोलीस प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरला आहे. वर्षावरील सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर, जयश्री जाधव, बळवंत वानखेडे, संजय जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर, नरेंद्र दराडे, वैभव नाईक, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सरकारविरोधात घोषणा देत विधान भवन परिसर दणाणून सोडला.

राज्यात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत, पण गुंड सुरक्षित – अंबादास दानवे
महाराष्ट्रात सध्या कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. एक सत्ताधारी आमदार पोलीस ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयावर गोळीबार करतो, अभिषेक घोसाळकर यांची हत्या होते तर गेल्या वर्षी एक आमदार पोलीस ठाण्याबाहेर खुलेआम गोळीबार करतो. अनेक गुंड वर्षा बंगल्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाबरोबर पह्टो काढत आहेत. मंत्रालयात एक गुंड रिल बनवतो. पुण्यातील एका गुंडाला हिंदू डॉन म्हटले जाते, एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला केला जातो. 4 हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे राज्य सुरू असेल तर सर्वसामान्य सुरक्षित नाहीत, पण गुंड सुरक्षित आहेत. राज्यात गुंडाराज सुरू आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केला.