
सामना प्रतिनिधी । मुंबई
पदवी प्रवेशाबरोबरच नोकरीत अनाथ, निराधार विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचे अखेर विद्यापीठाने मान्य केले आहे.
उच्च शिक्षणात अनाथ विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करावे असा शासननिर्णय एप्रिल 2018 मध्ये जारी करण्यात आला. मात्र मुंबई विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एफवायच्या प्रवेशात या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. याची दखल घेत प्रहार विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीत खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचे परिपत्रक जाहीर केले.

























































