
एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने अमेरिकेतील प्रतिष्ठत गोल्डन ग्लोब पुरस्कारावर अलीकडेच नाव कोरले होते. त्यापाठोपाठ आता या गाण्याला जगभरात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘ओरिजनल साँग्स’ या गटात नामांकन मिळाले आहे.
हिंदुस्थानी सिनेसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब असून ट्विटवर #NaatuNaatuForOscars ट्रेंड होताना पाहायला मिळाले. याशिवाय आणखी दोन विभागात हिंदुस्थानी चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. डॉक्युमेंट्री फीचर फिल्म या श्रेणीत ‘ऑल द ब्रिथ्स’ला तर डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या श्रेणीत ‘एलिफंट विस्फरर्स’ला नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ‘अवतार ः द वे ऑफ वॉटर’, ‘थार’, ‘द बेंचेस ऑफ इनशेअरिन’, ‘एलविस’, ‘एवरीथिंग एवरीव्हेयर ऑल ऍट वन्स’, ‘द फेबलमन्स’, ‘टॉप गन मेव्हरिक’, ‘ट्रँगल्स ऑफ सॅडनेस’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगणार आहे.


























































