ओशिवरा पोलिसांनी वाचवले 71 लाख रुपये ; चार खात्यांत जमा झाले होते पैसे

टास्कच्या नावाखाली सायबर ठगाने महिलेची 7 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गोल्डन अवर्समध्ये तपास करून त्या खात्याचा तपशील मिळवला. त्या चार खात्यांत फसवणुकीचे जमा झालेले 71 लाख पोलिसांनी गोठवले आहेत.

शहरात नोकरीच्या नावाखाली गृहिणी, तरुणींना व्हॉटसअपवर मेसेजच्या नावाखाली एक लिंक पाठवली जाते. लिंक पाठवून टास्कच्या नावाखाली ठग गंडा घालतात. जोगेश्वरी येथे राहणाऱया एका गृहिणीची अशाच प्रकारे फसवणूक झाली. 16 ऑगस्टला त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. यूटय़ूब चॅनल्सला लाईक केल्यास दिवसाला अडीच हजार रुपये मिळतील असे त्यांना भासवले. त्यांना पेड टास्कच्या नावाखाली टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले. ग्रुपमध्ये जोडल्यावर सुरुवातीला ठगाने काही पैसे महिलेला दिले. त्यानंतर पेड टास्कच्या नावाखाली तिच्याकडून एकूण 7 लाख 35 हजार रुपये उकळले. पैसे गेल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील, यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन जाधवर, उप निरीक्षक दिगंबर कुरकुटे, अशोक काsंडे, विक्रम सरनोबत आदी पथकाने तपास करून बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये असलेली 71 लाखांची चार बँक खाती गोठवली.