
मेट्रो स्टेशन आणि परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कांदिवलीतील डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मेट्रो स्टेशनवर धडक देत उग्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलनानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, पीडितेला न्याय मिळावा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, विधानसभाप्रमुख राजू खान, कैलास कणसे, संतोष धनवडे, सुषमा कदम, नगरसेवक सचिन पाटील, संगीता सुतार, विधानसभा संघटक राजन निकम, शाखाप्रमुख रवींद्र मर्ये, विजय मालुसरे सहभागी झाले होते.





























































