
सामना प्रतिनिधी । नगर
यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असला तरी ऊस उत्पादकांचे देणे (एफआरपी) मात्र थकीत आहे. गेल्या पंधरवाड्यात नगर व नाशिक जिल्ह्यातील तब्बल बावीस साखर कारखान्यांकडे 505 कोटी रुपयांची एफआरपी बाकी आहे. केवळ सहाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पूर्ण देणे दिले आहे.
साखरेची विक्री होत नसल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडे ’एफआरपी’ची थकबाकी वाढत चालली आहे. साखर कारखाने शेतातून ऊस तोडून नेऊन गाळप करत आहेत. कारखाने ऊस तोडून नेत असले तरी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत देत नसल्याने ऊस उत्पादकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जानेवारी महिनाअखेर साडेतीनशे कोटी रुपयांची एफआरपी थकली होती. तर 15 फेब्रुवारीपर्यंत ती वाढून पाचशे कोटी रुपयांपर्यंत गेली होती. आता फेब्रुवारीअखेरपर्यंत गेल्या पंधरवाड्यातील थकबाकी वाढून 505 कोटी रुपये शिल्लक आहे. सहकारी व खासगी कारखान्यांमध्ये गाळपात आघाडीवर असलेल्या अंबालिका या खासगी कारखान्याकडे फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्वाधिक 97 कोटी रुपये ’एफआरुपी’चे थकीत होते. गेल्या पंधरवाड्यात 88 कोटी रुपये थकले होते. त्यात आणखी थकबाकीची भर पडली आहे. प्रवरा कारखान्याकडे 49 कोटी रुपये थकले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रवरा कारखान्याची थकबाकी कमी झाली आहे. या कारखान्याकडे गेल्या पंधरवाड्यात 80 कोटी रुपये थकबाकी होती. अगस्तीकडे 12 कोटी, अशोक कारखान्याकडे 21 कोटी, वृद्धेश्वरकडे 42 कोटी रुपये रक्कम थकीत आहे.
गणेश, केदारेश्वर, तनपुरे, जय श्रीराम या कारखान्यांवर जप्तीची कारवाई गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली; परंतु, साखर विक्री करून अद्याप ऊस उत्पादकांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. गणेश कारखान्याकडे 16 कोटी 40 लाख, केदारेश्वर कारखान्याकडे 34 कोटी 19 लाख, तनपुरे कारखान्याकडे 51 कोटी 23 कोटी रुपये थकबाकी आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर ’एफआरपी’च्या थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला होता. हंगाम संपत आला तरी हा प्रश्न मिटलेला नाही. साखरेचा भाव व इतर समस्यांमुळे कारखान्यांनी ’एफआरपी’ची रक्कम ही एकरकमी देण्याएवजी टप्प्या-टप्प्याने देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी, शेतकरी संघटना ’एफआरपी’च्या प्रश्नावर शांत आहेत.
सात कारखान्यांची वेळेवर ’एफआरपी’
साखर कारखान्यांसमोर अनेक समस्या असल्या तरी काही कारखान्यांनी त्यावर तोडगा काढून वेळेवर ऊस उत्पादकांना पैसे दिलेले आहेत. नगरमधील ज्ञानेश्वर, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी व नाशिकमधील द्वारकाधीश अशा सात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे सर्व पैसे वेळेत दिले आहेत.
’एफआरपी’ थकवलेले कारखाने
कारखाना थकबाकी
अगस्ती 12 कोटी 72 लाख
अशोक 13 कोटी 76 लाख
प्रवरा 49 कोटी 24 लाख
गणेश 16 कोटी 40 लाख
कुकडी 42 कोटी 24 लाख
केदारेश्वर 51 कोटी 23 लाख
अंबालिका 97 कोटी 1 लाख
गंगामाई 20 कोटी 35 लाख
































































