पुलंच्या जन्मदिनी गुगलची डूडल रुपात मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या लेखणीची भुरळ पाडणारे अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे.

पुल बहुरूपी, चतुरस्र होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी या विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वी काम केलं होतं.

अशा या अवलिया व्यक्तिमत्वाची दाखल गूगलने घेतली आहे. 8 नोव्हेंबर 1919 हा त्यांचा जन्मदिन. यंदाच्या वर्षी त्याचं जन्म शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे.

या निमित्ताने गुगलनेही त्यांना डूडल रुपात मानवंदना दिली आहे. गूगलच्या आजच्या डूडलवर पुलं पेटी वाजवतानाचं त्यांचं चित्र रेखाटण्यात आलं आहे.

मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. चाळीसच्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या.

मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले.

त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली.

वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.

याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम असा आहे.

अशा या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची दाखल गूगलने देखील घेतल्याने तमाम मराठी भाषिक आणि पुलंचे चाहते आनंदले आहेत.