
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलमधून सोमवारी माघार घेतली. डाव्या पायाच्या टाचेला झालेली दुखापत अद्याप बरी झाली नसल्याने सिंधूला हा निर्णय घ्यावा लागला. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल ही स्पर्धा 14 डिसेंबरपासून ग्वांगझू (चीन) येथे होणार आहे. 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या सिंधूला ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत खेळताना ही पायाला दुखापत झाली होती.
या दुखापतीतून अद्याप सावरू न शकल्याने सिंधूला नाइलाजाने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याची माहिती तिचे वडील पी. व्ही रमन्ना यांनी दिली. ते म्हणाले, डॉक्टरांनी सिंधूला अजूनही विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सिंधूने दोन आठवडय़ांपूर्वी सरावाला प्रारंभ केलेला आहे, मात्र तिला पूर्णतः तंदुरुस्त व्हायला जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. राष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाला आम्ही याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे.


























































