
परप्रांतीय कामगाराने रंगकाम करीत असताना घरात कोणी नसल्याची संधी साधून बेडरूममधील कपाटातून 5 लाख 10 हजार रुपयांच्या रोकडसह 1 लाख 65 हजारांचे 10 तोळे सोन्याचे दोन गंठण असा सुमारे 6 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्टदरम्यान वासुद रोड येथील नितीन गवळी यांच्या बंगल्यात ही घटना घडली.
गणपतनाथ भवरनाथ (रा. मंडी, ता. जयाल, जि. नागोर, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नितीन शशिकांत गवळी (रा. वासुद रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
सांगोला येथील नितीन शशिकांत गवळी यांनी वासुद रोडला बांधलेल्या नवीन बंगल्यात रंगकाम करण्याचे काम परप्रांतीय मजूर शिवनाथ भवरनाथ याला दिले होते. मात्र, तो गावाकडे गेल्याने एक महिन्यापासून त्याचा भाऊ गणपतनाथ हा रंगकाम करीत होता. नितीन गवळी हे हॉटेल व्यवसाय, गाळा भाडय़ातून आलेली रक्कम व बांधकामासाठी मित्राकडून उसने घेतलेले सुमारे 5 लाख 10 हजार रुपये, तसेच पत्नीचे 10 तोळे सोन्याचे दोन गंठण त्यांनी कपाटात ठेवले होते. या कपाटाची चावी दुसऱया कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली होती. गणपतनाथ 15 ऑगस्टपूर्वी पाच दिवस सदर बेडरूमला रंगकाम करीत होता. मात्र, दोन दिवसांची सुट्टी घेऊन तो दुसऱया कामावर गेला होता. तो त्यानंतर कामावर परतला नाही. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी शिवनाथ याने नितीन गवळी यांच्या मोबाईलवर फोन करून भाऊ गणपतनाथचा फोन लागत नाही, तुमच्याकडे कामाला आहे का? असे विचारले. त्यावर त्यांनी तो 15 ऑगस्टनंतर माझ्याकडे कामाला आला नाही, असे सांगितले.
दरम्यानच्या काळात रंगकाम चालू असल्यामुळे घरातील कोणीही व्यक्ती सदर बेडरूममध्ये जात नव्हते. त्यामुळे ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोने व पैशांकडे कोणी लक्ष दिले नाही. 27 ऑगस्ट रोजी नितीन गवळी यांचा भाऊ महेश गवळी यांनी ‘पेंटर गणपतनाथ हा सांगोल्यातून 25 लाख रुपये घेऊन गावाकडे गेल्याची चर्चा सांगोल्यात चालू आहे, तो तुझ्याकडे कामावर होता. त्यामुळे तुझ्या घरातील काय घेऊन गेला आहे का बघ’, असे सांगितल्यानंतर त्यांनी बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉव्हरमधील पैसे व सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली असता, ते मिळून आले नाहीत. याबाबत नितीन गवळी यांनी पेंटर मनीष याच्याकडे चौकशी केली असता गणपतनाथ याने काही दिवसांपूर्वी गावाकडे मोठय़ा प्रमाणात रक्कम पाठवून दिल्याचे सांगितल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला.
































































