पैठणच्या आद्य गणेश मंडळाने धर्मांध रझाकारांशी दिली कडवी झुंज!

>> बद्रीनाथ खंडागळे

पैठणच्या आद्य गणेश मंडळाने यंदा 98 व्या वर्षात पदार्पण केले आहे. निजाम राजवटीतील धर्मांध रझाकारांशी कडवी झुंज देणाऱ्या या मंडळाने 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला तब्बल 18 वर्षांच्या मुक्तिसंग्रामाचे स्वरूप दिले होते. 1930 साली बसवलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे हैदराबाद संस्थान खालसा झाल्यावरच 18 सप्टेंबर 1948 रोजी वाजतगाजत विसर्जन केले. गोदावरीच्या पलीकडून पोलीस अॅक्शन’ झाली अन् निजाम शरण आला. तेव्हाच सशस्त्र भारतीय लष्कराच्या उपस्थितीत पैठणकरांनी ही विसर्जन मिरवणूक काढली हे विशेष!

हैदराबादच्या निजाम कोठीवर पैठणच्या गणेश भक्तांचे धरणे !

निजामशाहीविरुद्धच्या संघर्षाची चित्तथरारक पार्श्वभूमी लाभलेल्या पैठणच्या ‘आद्य गणेश मंडळा’ची शतकाकडे वाटचाल सुरू आहे ! या मंडळाने सलग 18 वर्षे ‘श्री’ मूर्तीचे विसर्जन न करता रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध एल्गार पुकारला होता. पैठणकर गणेशभक्तांनी तर थेट हैदराबाद येथे निजामाच्या ‘किंग कोठी’ वर जाऊन धरणे धरले होते… दरम्यान, गोदावरीच्या पलीकडून (शेवगाव, जि. नगर) येथून हिंदुस्थानी लष्कर पैठणला दाखल झाले. अन् निजामशाहीचा बीमोड केला. धर्मांध अत्याचारी राजवटीचा अस्त झाल्यावरच ढोल- ताशांच्या गजरात ‘श्री’ मूर्ती गोदापात्रात विसर्जित करण्यात आली !

कधीकाळी पुण्याच्या पेशव्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या वानोळे सावकार यांच्या पुरातन वाड्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने या मंडळाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने ‘परकीय राजवट’, ‘स्वातंत्र्य व पारतंत्र्य’, ‘स्वराज्य व स्वधर्म’ अशा विषयांवर निबंध स्पर्धा सुरू केल्या. मेळे, नाटके व पोवाडे याद्वारे जनजागृतीचे कार्य हाती घेतले. निजामशाहीचे अत्याचार व धर्मांध रझाकारांची क्रूरता यांचे वाभाडे काढणाऱ्या या उपक्रमांनी नागरिकांचे सहकार्य मिळू लागले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव व तेथे होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले. विसर्जन मिरवणुकांवर तर बंदीच घातली. अशा असंतोषाच्या वातावरणात 1928 साली दुर्गावाडी भागातून काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत रझाकारांनी आडकाठी केली. मोठ्या संघर्षानंतर विसर्जन पार पडले. मात्र त्यानंतर दरवर्षी सरकारी मुस्कटदाबी व दबावतंत्र वाढतच गेले. कार्यकर्त्यांच्या मागे टेहळणीचा ससेमिरा लागला. मग मात्र पैठणकर हे रझाकारांच्या विरुद्ध पेटून उठले. ‘राजाश्रय’ नसला तरी ‘लोकाश्रय’ लाभू लागला. दरम्यान, 1930 साली पैठणचे भूमिपुत्र दिवंगत केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण हे या मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या पैठण येथील घराच्या परिसरातच हे मंडळ आहे. विशेष म्हणजे हे घर अजूनही तेथेच आहे. यावेळी गंगूबाईच्या वाड्यातील कमानीत गणेशमूर्तीची स्थापना केली गेली. शंकरराव चव्हाण अध्यक्ष झाल्यानंतर हा धर्मोत्सव चक्क मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या चळवळीचे केंद्रबिंदू बनला.

आद्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा लढा

आद्य गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निजामशाही विरुद्ध लढा पुकारला. आंदोलने सुरू झाली. लोकांचा सहभाग वाढला. माजी नगराध्यक्ष दिगंबरराव कावसानकर, माजी नगराध्यक्ष त्र्यंबकदास पटेल, तात्यासाहेब महाजन, सुमेरसींग करकोटक, चंपालाल नागोरी, किसनदास पटेल, दामोदर देशपांडे, पंडितराव महाजन, बळवंतराव देशमुख व बबनराव कुलकर्णी या तत्कालीन तरुणांनी यात सहभाग घेतला. नाथवंशज रंगनाथ बुवा गोसावी व इतिहास संशोधक तथा पुराणवस्तु संग्राहक बाळासाहेब पाटील यांनी तर सशस्त्र कारवाया करून आंदोलनाला अधिक धारदार केले.

तब्बल 18 वर्षे ‘श्री’ मूर्तीचे विसर्जन न करता है। आंदोलन धगधगत होते. अखेर गोदावरी नदीच्या पलीकडे असलेल्या हिंदुस्थानी हद्दीतून लष्कर निजामाच्या राजवटीत पैठणमध्ये घुसले आणि ऐतिहासिक ‘पोलीस अॅक्शन’ झाली. निजाम शरण आला. रझाकारांनी जिवाच्या आकांताने गोदावरीत उड्या टाकल्या. मोठ्या संघर्षाची शक्यता असताना हैदराबाद संस्थान सहजपणे मुक्त झाले. विशेष म्हणजे गणेश विसर्जनाच्या 1 दिवस अगोदरच मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्याच दिवशी आद्य गणेश मंडळाच्या ‘श्री’ मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व लष्कराच्या उपस्थितीत 18 वर्षांनंतर गोदावरीत गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.