
>> बद्रीनाथ खंडागळे
पैठणची पैठणी… अनेक परकीयांची अतिक्रमणे झेलून पैठणची ही हस्तकला पाय घट्ट रोवून उभी आहे. पाहूया याविषयी ज्ञात अज्ञात..
प्रतिष्ठान नगरीच्या नागघाटाकर धर्मसभा भरवली जात होती. त्या प्राचीन घाटावर आता कबुतरांची गुटरगू ऐकू येते. पेशव्यांना कर्जपुरवठा करणाऱया सावकारांचे वाडे भग्नावस्थेत ज्या परिसरात उभे आहेत. त्या ‘पालथी नगरी’त सध्या वटवाघळांचा संचार आहे. जुनं ते सारं काळाच्या ओघात लुप्त झालं. मात्र समृद्ध भूतकाळाची स्मृती जागवणारा एक दुवा वर्तमानातही कायम आहे. गतसंपन्नतेची साक्ष देणारा हा दुवा म्हणजे ‘राजवस्त्र पैठणी’!
3 हजार वर्षांचा संपन्न वारसा!
पैठणी साडी म्हणजे हस्तकलेचा अद्वितीय नमुना. 3 हजार वर्षांचा इतिहास असलेले हे महावस्त्र मराठी स्रियांसाठी शब्दश सौभाग्याचे लेणे ठरलेले आहे. अशा या पैठणीला हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभली असली तरी निजामकाळात या वस्त्रकलेने राजाश्रय गमावला. पैठण निजामशाहीत भरडले गेले. निजामाच्या काळात अनेक पैठणी विणकर विस्थापित झाले. हैदराबादमुक्ती संग्रामानंतर अनेक विणकरांनी पुन्हा पैठणला बस्तान मांडले, असा इतिहास आहे.
पैठणीकर आधारित गल्ल्यांची नावे…
पैठण हे राजधानीचे शहर असताना पैठणी निर्मिती हाच येथील मुख्य व्यवसाय होता. विदेशात हे वस्त्र निर्यात होत असल्यामुळे पैठणला जागतिक बाजारपेठेचा दर्जा मिळाला होता. या व्यवसायाचा आवाका पाहता पैठणच्या गल्ल्या-मोहल्यांची नावेही पैठणी साडीसाठी लागणाऱया साहित्यापासून पडलेली आहेत. विशेष म्हणजे आजमितीला या गल्ल्यांमध्ये पैठणी साडीचा मागमूस नसला तरी नावे मात्र कायम आहेत! ही नावे अशी… रंगारगल्ली (पैठणीसाठी तयार केलेल्या रेशमी धाग्यांना रंगकाम करणाऱया रंगारी समाजाची वसाहत), पावटागल्ली (पावटा नावाने ओळखले जाणारे साहित्य. चांदीच्या तारांना दाब देण्यासाठी त्याचा कापर होत असे. मेहनतीने हे काम करणाऱया कामगारांची वसाहत), जरगल्ली (जर तयार करणारेवक चमकवणारे कारागीर यांची घरे असलेला परिसर), तारगल्ली (रेशमी जर उत्पादित करणारे व सोन्याचांदीच्या तारांची निर्मिती करणारे धनाढय़ व्यावसायिक यांची वसाहत), हताईमोहल्ला (लाकूड वापरून हातमाग बनवणारे व त्याची दुरुस्ती करणारे तसेच पैठणीसाठी लागणारे सर्व साहित्य निर्मिती करणारे कुशल कलावंतांचे या मोहल्यांमध्ये वास्तव्य होते).
प्रचार प्रसारासाठी दर-सवलती
हजारो वर्षांतील राजकीय स्थित्यंतरानंतरही पैठणमध्ये या कलाकारीची पाळेमुळे घट्टपणे रुजलेली आहेत. केवळ विणकरांनी ही सांस्कृतिक कला जोपासली आहे. आता तर महाराष्ट्र वस्रोद्योग महामंडळाच्या वतीने पैठण येथे ‘मऱहाटी’ पैठणी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सरकारतर्फे येथे पैठणी निर्मिती व विक्री केली जाते. सध्या येथे 112 हातमाग आहेत. 72 हातमागांवर पैठणी तयार करण्यासाठी प्रशिक्षित महिला विणकर अहोरात्र काम करतात, तर 50 हातमागांवर महिलांना पैठणी विणण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पैठणी साडीचा प्रचार प्रसार व्हावा, श्रीमंत वाडय़ावर नेहमी दिसणारी पैठणी सर्वसामान्य महिलेच्या घरकुलातही दिसावी यासाठी 22 हजार ते दीड लाखांपर्यंत असलेल्या पैठण्या 14 ते 50 टक्के सवलतींचा दर लावून शासकीय केंद्रात त्यांची विक्री केली जात आहे.
पैठणी साडी मांसाहारी?
जैनधर्मीय महिला कधीच पैठणी परिधान करत नाहीत. यामागील कारणाचा शोध घेतला असता मजेदार बाब समोर आली. रेशीमकिडय़ांपासूनच पैठणीसाठीचा धागा तयार केला जातो. ही प्रक्रीया प्राणिजन्य असल्याने पैठणीवर मांसाहारी असल्याचा शिक्का बसला आहे. तसे पाहिल्यास आर्थिक दृष्टीने संपन्न असलेला हा समाज पैठणीचा हक्काचा ग्राहक असायला हवा होता, परंतु पैठणी मांसाहारी असल्याच्या समजुतीमुळे हा वर्ग पैठणीपासून कायमचा दुरावला आहे.





















































