राहत फतेह अली तस्कर , परकीय चलनाचा गफला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahat-fateh-ali-khan-new

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानात येऊन पैसा कमावणारा पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान हा परकीय चलनाचा तस्कर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणि फेमाने राहत फतेहला नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून पुन्हा एकदा पाकिस्तानी कलावंतांचे काळे धंदे उघडकीस आले आहेत. पाकिस्तानी कलावंतांना हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात विरोध आहे.

राहत हा प्रसिद्ध दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचा पुतण्या आहे. 2009 मध्ये ‘लागी तुमसे मन की लगन’ या गाण्याने राहतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या दहा वर्षांत त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आणि प्रचंड कमाई केली. पदार्पणापासून राहत हा परकीय चलनाच्या माध्यमातून कमाई करीत होता पण त्याचा कोणताही हिशेब त्याने आयकर विभागाला दिलेला नाही.

3 लाख 40 हजार डॉलर कमावले

‘ईडी’ आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) यांच्या तपासात राहत फतेह हा तस्कर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहतने 3 लाख 40 हजार डॉलर्स कमावले. त्यातील 2 लाख 25 हजार डॉलर बेकायदेशीररीत्या हिंदुस्थानबाहेर पाठविले. इतका पैसा कसा कमावला आणि हिंदुस्थानबाहेर कुठे आणि का पाठविला अशी विचारणा ‘ईडी’ने केली आहे.

राहतचे मोईन कुरेशीशी कनेक्शन

2011 मध्ये परकीय चलन घेऊन जाताना राहत फतेहला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले होते. त्यावेळी मांस निर्यातदार मोइा&न कुरेशीच्या घरी एका लग्नसमारंभासाठी आला होता. हा मोईन कुरेशी पुन्हा वादात अडकला आहे. सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादामागे कुरेशी आहे. कुरेशीकडून अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. राहतच्या मोईन कुरेशी कनेक्शनचा तपास सुरू आहे.

300 टक्के दंड आणि अटक होऊ शकते

‘ईडी’ने बजावलेल्या नोटिसीला समाधानकारक उत्तर दिले नाही तर राहतला तस्करी केलेल्या रकमेच्या 300 टक्के दंड भरावा लागेल. त्याला अटकही होऊ शकते.