
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एक भीषण आकडेवारी उघड झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या प्रांतात कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली 2439 महिलांवर बलात्कार करण्यात आला असून 90 जणींची हत्या करण्यात आली आहे.
पंजाबच्या माहिती आयोगाने ही माहिती दिली आहे. या आकडेवारीत लाहौर येथे 400 महिलांवर बलात्कार केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. तसंच, 2300हून अधिक महिलांचं अपहरण करण्यात आलं आहे. पाकिस्तानात मानवाधिकार आयोगातील नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानात प्रतिदिन सरासरी 11 बलात्कारांची नोंद केली जाते.
या आकडेवारीनुसार, गेल्या सहा वर्षांत पोलिसात बलात्काराच्या 22 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. कौटुंबकि प्रतिष्ठेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केले जात असून त्याचा दोष पीडितेवरच टाकला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपराधी वाढत आहेत. तसंच या प्रकरणात 22 हजार प्रकरणांमध्ये 77 प्रकरणांवर शिक्षा सुनावली गेली आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांत शिक्षा होण्याची टक्केवारी अवघी 0.3 इतकी आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या बलात्काराची संस्कृती फोफावली आहे. इथे लैंगिक शोषणासाठी पीडितेलाच दोषी ठरवलं जातं आणि सगळ्या पुरुषांना नैसर्गिकरित्या हिंसक मानलं जातं, असं मत लाहौर प्रबंधन विज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक निदा किरमानी यांनी व्यक्त केलं आहे.






















































