
सोमवारी पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये कट्टरपंथीयांनी प्राचीन गणपती मंदिर व आतील देव-देवतांच्या मूर्तीची तोडफोड केली.
या घटनेचा हिंदू धर्मीयांनी तीव्र निषेध केला असून हल्लेखोर व हल्ल्याच्या सूत्रधारांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कट्टरपंथीयांनी कोणताही ठोस पुरावा नसताना हिंदू मुलावर मोहम्मद पैगंबरांच्या विटंबनेचा आरोप लावला. अशा खोटय़ानाटय़ा आरोपांतून आमचा नाहक छळ केला जात असल्याचा दावा स्थानिक हिंदूंनी केला आहे. आम्ही मंदिरांवरील हल्ले खपवून घेणार नाही. सरकारने लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदू धर्मियांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, मात्र कुणालाही अटक केलेली नाही.
हिंदू मंदिरावरील हल्ल्याची 20 दिवसांतील तिसरी घटना
पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिरावर कट्टरपंथीयांनी हल्ला केल्याची मागील 20 दिवसांत तिसरी घटना घडली आहे. सुरुवातीला सिंध प्रांतातील बादिन जिह्यातील एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर सिंध प्रांतातच थारपारकर जिह्यातील नागारपारकर परिसरात धार्मिक दहशतवाद्यांनी दुर्गा मातेची मूर्ती फोडली होती. हल्लेखोर मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसले व दरवाजा बंद करून त्यांनी मूर्ती व इतर सामानांची तोडफोड केली होती. हल्लेखोर अजूनपर्यंत मोकाटच आहेत.






























































