
गणशोत्सवापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. यामुळे उजनी धरणातून भीमा (चंद्रभागा) नदीपात्रात 60 हजार, तर वीरमधून 1550 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. चंद्रभागा पात्रातील दगडी पुलासह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या गावातील व शहरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. गणेश विसर्जन करताना सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्यातही दमदार पाऊस झाला असून, ओढे, नाल्यांना पूर आला आहे.
मागील महिन्यात 10 ऑगस्टपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आठवडाभर पूरपरिस्थिती राहिली. मात्र, 90 हजारांपर्यंत पंढरपूर येथे विसर्ग जाऊन थांबला होता. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टळली होती. यानंतर उजनी धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आणि भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्गदेखील बंद करण्यात आला होता. आता पुन्हा गणेशोत्सव काळात दमदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे उजनी धरणातून आज दुपारी 61 हजार 600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागा नदीपात्रातील दगडीपूल पाण्याखाली गेला आहे. तसेच वाढत्या विसर्गामुळे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या 42 गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे बंधारे गेले पाण्याखाली
भीमा (चंद्रभागा) नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे
बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱयांवरून होणारी वाहतूक बंद पडली आहे.
दुधनीत तुफान पाऊस;घरे, दुकानांत पाणी घुसले
दुधनी परिसरात रात्री काही वेळातच तुफान पाऊस पडून दुधनी गावातील अनेक घरांमध्ये, व्यापारी दुकानांमध्ये पाणी शिरून प्रचंड नासाडी झाली. पावसाने रौद्ररूप दाखवून सर्व परिसराची दाणादाण उडवून दिली.
अडीच तासांत 42 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक ते विरक्त मठपर्यंत रस्त्यावर छातीपर्यंत पाणी वाहत होते. भाजीपाला मार्केट रोडवर गळ्यापर्यंत पाणी होते. यामुळे या परिसरातील किराणा दुकान, स्टेशनरी दुकान, फोटो स्टुडिओ, सोन्या-चांदीची दुकाने, मेडिकलसह छोटय़ा-मोठय़ा दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. नागोबानगर, बावनटक्के परिसर, भाजीपाला मार्केटजवळील लक्ष्मीनगर, चौंडेश्वरी मंदिर परिसर, मैंदर्गी नाका, सिन्नूर नाका परिसरातील अनेक घरांमध्ये पावसामुळे गुडघ्याइतके पाणी होते. दुधनी आणि परिसरातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते.

































































