कॉरिडॉरचे संकट दूर करण्यासाठी महायज्ञ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरचे अरिष्ट निवारणार्थ श्री पुरुषोत्तमयाग तथा विष्णुयाग (महायज्ञ) दि. ९ ते १५ जून या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये बाधितांनी व पंढरपूर नगरीचे पावित्र्य व प्राचीनत्व मोडू नये, असे वाटणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे ! जो जो करील तयांचे ! परंतु तेथ पाहिजे ! अधिष्ठान भगवंतांचे !! 

या उक्तीप्रमाणे पुरातन व पवित्र पंढरी क्षेत्राचे मांगल्य नष्ट करू पाहणाऱ्या, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला बाधितांनी सनदशीर मार्गाने विरोध केला आहे. आपली बाजू सत्याची व न्यायाची असल्याने आजवर सरकार आपल्याशी चर्चा करायला धजावले नाही. स्वाक्षरी अभियान, प्रारूप मतदान, धरणे, सत्याग्रह, निर्धार मेळावा, सभा, मोर्चा, शासकीय पडीक जागांची शोधयात्रा, विक्रमी हरकती व सुनावण्या या सर्वांतून प्रखर जनआंदोलन घडवले आहे.

सध्या अधिक मास असल्याने आपल्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान मिळवण्यासाठी, कॉरिडॉर अरिष्ट निवारणार्थ श्री पुरुषोत्तमयाग तथा श्रीविष्णुयाग करण्यात येणार आहे. यात सहभाग नोंदवून ईशकृपा प्राप्त करून आपल्या आंदोलनास विजय मिळवावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष ह.भ.प. माउली महाराज गुरव व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

हिंदू महासभा भवनमध्ये उपक्रम 

हा महायज्ञ हिंदू महासभा भवन या ठिकाणी दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११ या वेळेत होणार आहे. दि. १५ रोजी अवभृत स्नानची मोठी मिरवणूक काढून या यज्ञाचा समारोप होणार आहे.