पंढरपूरात 137 वारकऱ्याना भगरीतून विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा बुधवारी (दि. 1) लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत निळोबा सेवा मंडळ मठामध्ये आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर व आमटी खाल्ल्यामुळे 137 भाविकांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या भाविकांना मध्यरात्री पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषबाधा झालेले सर्व भाविक हे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक मनोजकुमार माने यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या भाविकांची भेट घेतली. तसेच, मठामध्ये तयार करण्यात आलेल्या भगर व आमटी या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून भगर आणली त्या दुकानदाराकडे चौकशी करण्यात येत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर माघी यात्रा होत असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले. याच यात्रेसाठी नांदेड व हिंगोली जिह्यांतील सुमारे 185 भाविक असलेली पायी दिंडी 31 जानेवारी रोजी पंढरपुरात दाखल झाली होती. संत निळोबा सेवा मंडळ मठामध्ये या दिंडीचा मुक्काम होता.

दिंडीतील भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर व आमटी खाल्ली. फराळ केल्यानंतर हे भाविक मठात झोपी गेले. मात्र, गुरुवारी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास 137 भाविकांना मळमळ, उलटय़ा व चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे सर्व भाविकांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. बाधित आठ भाविकांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सर्व भाविकांवर तातडीने उपचार करण्यात आले. आता सर्व वारकऱयांची प्रकृती स्थिर आहे.

बाधित वारकऱ्यांची नावे

वनिता यनगणवाड (वय 42), प्रदीप मुरमुरे (14), जीवन काळे (62), पंडित वानखोडे (55), दिगंबर तुतनर (45), शोभाबाई देशमुखे (50), भगवान वानखोडे (65), जनाबाई ढाकरे (58) यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. सारिका गंगाधर बल्लाळ (वय 35), राजू संभाजी मुरमुरे (35), शिवाजी सटवाजी भिसे (50), मुरलीधर रावजी अदमाने (70), शंकर खंडू शेळके (40), विश्वंभर सखाहरी धातरट (60), गंगाबाई तुकाराम वानोळे (60), भीमराव रामचंद्र सूर्यवंशी (40), विठ्ठलसिंग संतरामसिंग ठाकूर (39), विश्वनाथ रामचंद्र भिसे (60), गंगाधर खंडूजी बल्लाळ (43), पंढरीनाथ कोंडीबा दुधकावडे (64), सुभाष विठ्ठल भुतनाळ (30), सतीश दादाराव वानखेडे (45), भरत पिराजी वानखेडे (60), सटवा पिराजी मुळेकर (70), विश्वंभर सखाहरी धात्रक (वय 60).

उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या 137 भाविकांपैकी काही भाविक अतिदक्षता विभागात, तर काही जनरल वॉर्डात उपचार घेत आहेत. या भाविकांची प्रकृती स्थिर आहे.

– महेशकुमार माने, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर

पंढरपुरातील ज्या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले आहे, त्या दुकानातील साहित्य व मठामध्ये तयार केलेले भगर व आमटीचे नमुने कारवाईसाठी ताब्यात घेतले आहेत. तपासणीनंतर कारवाई केली जाईल.

-प्रशांत कुचेकर, अन्नसुरक्षा अधिकारी, पंढरपूर

संत निळोबा महाराज सेवा मंडळ त्यागमूर्ती बबन महाराज भक्तसदन येथील 137 वारकरी भाविकांना अन्नातून विषबाधा झाली. बाधित वारकऱयांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सर्व भाविकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व बाधित वारकरी नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिह्यांतून आले होते.

— गजानन गुरव, प्रांताधिकारी, पंढरपूर.