
सामना प्रतिनिधी। पणजी
गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असून संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून राज्यभरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
आगामी 24 तासात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
वाळपई येथे 6 इंच, पेडणेत 5 इंच, सांखळीत 4 इंच, सांगेत 3.5 इंच, आणि पणजीत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या काळात 2 इंच पावसाची नोंद झाली. याशिवाय रात्रभर 2.5 इंच पाऊस पडला आहे.
येत्या 24 तासात देखील मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेल्या 24 तासात पणजीबरोबरच मुरगाव आणि केपेमध्ये देखील जवळपास 3 इंच तर सर्वात कमी काणकोण येथे 0.75 इंच पावसाची नोंद झालेली आहे.
यंदा सध्या पडत असलेला पाऊस हा विक्रमी आहे. गेल्या 24 तासात पणजीतील एकूण 4.5 इंच पावसामुळे यंदाच्या मोसमातील नोंद 2230 मिमी एवढी झाली आहे. दिवसभर पावसाची संततधार चालू होती.
दरम्यान, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून याचा परिणाम सर्वत्र जाणवत होता. मांडवी नदीत शनिवार प्रमाणेच रविवारी देखील भरतीच्या वेळी पाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक होते. त्यामुळे रायबंदर सारख्या ठिकाणी मांडवीचे पाणी महामार्गापर्यंत पोहोचले होते. अनेक शेतांमध्ये नदीचे पाणी पसरले. आमोणे भागात पूरसदृश्य परिस्थिती होती. साखळी, डिचोलीतील नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत.
अंजुणे धरणातून पाण्याचा मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास साखळी आणि डिचोली या दोन्ही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.
डिचोलीमधील वाळवंटी नदीने धोक्याची पातळी गाठली असून अंजुणे धरणातील पाणी सोडणे सुरूच आहे. रविवारी डिचोली मामलेदारांनी अंजूणे धरणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. साखळीतील वाळवंटी व डिचोलीच्या नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही ठिकाणी पंप सुरू करून पाणी बाहेर फेकण्यात आले. दोन्ही नद्या किनारा सोडून वाहत होत्या.
अनेक गावातील खालच्या भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाणी भरून राहिल्याने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अंजुणे धरणातील अतिरिक्त पाणी रविवारीही समोरील नदीत सोडणे सुरूच होते.
मधलावाडा-सावईवेरे येथील गोशाळेवर वृक्ष कोसळल्याने छप्पर व भिंतीखाली सापडून चार गुरांचा मृत्यू झाला, तर 14 गुरे जखमी झाली. संपूर्ण गोशाळा जमिनदोस्त झाली आहे. उदय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भटक्या गुरांच्या पालन पोषणासाठी दोन वर्षांपूर्वी ही गोशाळा उभारली होती.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सज्ज होत असलेल्या फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या छप्पराचे पत्रे काल रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे उडून गेले व हे लोखंडी पत्रे मडगाव-फोंडा महामार्गावर पडले. आश्चर्याची बाब म्हणजे या स्टेडियमच्या दुरूस्तीवर क्रीडा खात्याने 60 कोटी 44 लाख रूपये खर्च केले होते. तरीसुद्धा कालची घटना घडल्याने दुरूस्तीच्या कामासंदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
































































