गोव्यात जंपिंग चिकनसाठी बेडकांची शिकार करणाऱ्यास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पणजी

पावसाला सुरुवात होताच दक्षिण गोव्यातील काही भागांमध्ये जंपिंग चिकन अर्थात बेडकांच्या चिकनसाठी बेडकांच्या शिकारी सुरू झाल्या आहेत.

फातोर्डा येथील चंद्रावडो परिसरात बेडकांची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नावेदाद सोराईस याला वनखात्याने अटक केली आहे. त्याने पकडलेल्या तीन मोठया प्रजातीच्या बेडकांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री दिडच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. मूळ चंद्रावाडो येथील नावेदाद जॉकीम सोराईस हा शुक्रवारी रात्री चंद्रावाडो येथील शेतात बेडुक पकडण्याचे काम करत होता. या वेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचार्‍यांना सोराईस याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्वरित शेतात उतरून त्याला ताब्यात घेतले.

मडगाव वन कार्यालयाचे वन अधिकारी सिद्धेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला सोराईस याने आपण मासे आणि खेकडे पकडण्यासाठी शेतात उतरल्याचे वन कर्मचार्‍यांना सांगितले होते. पण त्याच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता खेकडयांबरोबर मोठया आकाराचे तीन बेडूक आढळून आले.

त्यानंतर सोराईस याला लगेच ताब्यात घेवून त्याच्या विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान त्या तीन बेडकांना पुन्हा शेतात सोडण्यात आल्याची माहिती ही गावडे यांनी दिली आहे.