पंकजा मुंडे यांनी दिला बीड जिल्हयातील शाळा दुरूस्तीसाठी 25 कोटीचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

बीड जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारी शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री आणि जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजनेतून जिल्हयातील एक हजार 927 शाळा खोल्यांच्या दुरूस्तीसाठी 25 कोटी 20 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या निधीतून 11 तालुक्यांतील शाळांची दुरूस्ती होणार असून त्यांना नवे रूप मिळणार आहे.

जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे 2 हजार 537 शाळा असून बहुतांश ठिकाणी शाळा खोल्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळा खोल्यांची दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागाकडे पाठवला होता. या विभागाच्या मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लगेचच हा प्रस्ताव मंजूर करून 2515 मधून यासाठी 25 कोटी 20 लाख 40 हजार रूपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. तसे आदेशही जिल्हा परिषदेला दिले आहेत. दुरूस्तीनंतर सर्व शाळांची रंगरंगोटी एकसारखी असावी आणि 26 जानेवारीपर्यंत त्याचे काम पुर्ण करावे अशा सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत.

या निधीतून संबंधित शाळांच्या गरजेनुसार खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. मंजूर झालेला तालुकानिहाय निधी पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे दुरूस्ती होणाऱ्या शाळांच्या खोल्यांचे आहेत.)

  • बीड – 4 कोटी 20 लाख 99 हजार (408)
  • परळी – 9 कोटी 52 लाख 42 हजार (324)
  • अंबाजोगाई – 3 कोटी 28 लाख 58 हजार (203)
  • गेवराई – 91 लाख 92 हजार (100)
  • पाटोदा – 1 कोटी 25 लाख 57 हजार (143)
  • शिरूर -68 लाख 90 हजार (92)
  • वडवणी- 27 लाख 40 हजार (34)
  • केज- 1 कोटी 59 लाख 97 हजार (274)
  • माजलगांव – 92 लाख 80 हजार (99)
  • आष्टी – 81 लाख 95 हजार (111)
  • धारूर – 1 कोटी 69 लाख 90 हजार (139)