
सामना प्रतिनिधी । परळी-वैजनाथ
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे संचालक असलेल्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या दिवाळी शुभेच्छा पत्रावर मुंडे यांना स्थानच देण्यात आलेले नाही. स्वतः संचालक असलेल्या दीनदयाळ बँकेच्या दिवाळीच्या ग्रीटिंग कार्डवर त्यांचे फोटो आणि नाव नसल्याने चर्चा रंगली आहे. तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. हे अनवधानानं घडलं आहे की कुणाचा डाव आहे? अशी चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडे यांच्या नावाचा आणि फोटो बँकेच्या दिवाळी कार्डवर असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. आपल्याच परिवारातील संस्थेला मुंडे यांचा फोटो का छापला नाही असा प्रश्न समर्थकांना पडला आहे? त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नेमके असे करणारे झारीतील शुक्राचार्य कोण? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



























































