
सामना ऑनलाईन । बंगळुरू
महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे श्रीराम सेनेचा सक्रिय कार्यकर्ता परशुराम वाघमारे याचा हात असल्याचा संशय आहे. पण त्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) अद्यापि कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. वाघमारे याने कर्नाटकच्या पत्रकार गौरी लंकेश यांची गोळय़ा घालून हत्या केल्याची कबुली दिलेली आहे.
शिवाय लंकेश, पानसरे, कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचा रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसआयटी वाघमारेची चौकशी करणार आहे. वाघमारे सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. परशुराम वाघमारे याच्यासह त्याच्या गँगमधील गुंडांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एसआयटीने संपर्क साधलेला नाही, असे कर्नाटकमधील ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. परशुराम वाघमारे याने ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांच्यावर गोळीबार केला; परंतु हा आरोप वाघमारेच्या कुटुंबीयांनी फेटाळला आहे.
























































