
सामना प्रतिनिधी ।परळी वैजनाथ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैजनाथाचा महाशिवरात्री पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी प.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य प.हेमंत पेंडसे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. मंदिरातून निघालेल्या प्रभू वैजनाथाच्या पालखीचे देशमुख पार, अंबेवेस, बांगर गल्ली, गणेशपार, नांदूरवेस, गोपनपाळे गल्ली या भागातील भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले.पालखी मार्गावर रांगोळयाची आरास काढून रोशनाईने परिसर उजळून निघाला होता.
महाशिवरात्रीनिमित्त वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने देशमुख पार येथे बुधवारी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प.हेमंत पेंडसे(पुणे)यांची भक्ती संगीत संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ओंकार स्वरूपा,जय जय राम कृष्ण हरी,अभिर गुलाल उधळीत रंग,बोलतो पांडुरंग,नाही पुण्याची मोजणी,अवघे गरजे पंढरपूर,इतना तो करदो स्वामी जब प्राण तनसे निकले,यासह अनेक भक्तिगीते सादर करून भक्ती संगीताची मेजवानीच प.हेमंत पेंडसे यांनी परळीकर रसिकांना दिली. यावेळी वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख,प्रा.बाबासाहेव देशमुख, यशवंत पुजारी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसर या कार्यक्रमाने रसिक व भाविकांनी फुलून गेला होता.

























































