
अवाजवी शुल्काची मागणी करणाऱया गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करा, पालक व विद्यार्थ्यांचा ठिय्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत शाळा बंद असूनही पालकांकडून अवाजवी शुल्काची मागणी, शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याबद्दल, तर शिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीस सहा महिने उलटूनदेखील वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ पालक व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत सर्व शाळा बंद होत्या. मुलांना फक्त ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. राज्य सरकारनेदेखील शाळांनी जास्तीची फी वसुली करू नये, याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र, गॅलॅक्सी नॅशनल स्कूलने पालकांकडून इतर शुल्काच्या नावाखाली अवाजवी फी वसुली केली. पालकांनी कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शालेय प्रशासनास फक्त ऑनलाइन शिक्षणाची फी देण्याची सहमती दर्शवली. शालेय प्रशासन आजही पालकांकडून कोरोनाकाळातील संपूर्ण वर्षाची पूर्ण फी भरून घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. फी भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणदेखील बंद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने केलेल्या सूचनांनादेखील शालेय प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रभारी शिक्षणाधिकारी सय्यद यांनी गॅलॅक्सी नॅशनल स्कूलला शैक्षणिक शुल्क कमी करून, अधिकचे शुल्क पालकांना परत करण्याचे व ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठवेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करून पूरक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे लेखी आदेश काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात वैभव भोराडे, रमेश बेल्हेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, गजानन भांडवलकर, दादा दरेकर, नीलेश बांगरे, अंकुश गिते, जकी मुजावर, तुकाराम गिते, बाळासाहेब सांगळे, गजानन गिते, सविता गुंजाळ, सुमय्या पठाण, सुवर्णा गिते, सीमा ससे, वैशाली पवार, रवींद्र बेल्हेकर, वैशाली साळवे आदी पालकांनी सहभाग नोंदवला.
































































