
मुंबईचा 14 वर्षांखालील खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अंतिम साखळी लढतीत वेंगसरकर संघाने अनुज चौधरीच्या (नाबाद 115) खेळीमुळे सर्वबाद 245 धावांचे लक्ष्य उभारले.
कर्नाटक स्पोर्टिंगवर वेंगसरकर संघाच्या 4 बाद 64 धावा अशा अडखळत्या सुरुवातीनंतर आर्शियान शेख (53) आणि अनुज चौधरी (नाबाद 115) यांची जोडी जमली आणि त्यांनी पाचव्या विकेटसाठी 105 धावांची भागी रचली. अनुजने तीन सामन्यांत हे दुसरे शतक नोंदविताना 99 चेंडूंत 19 चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र अन्य फलंदाजांची योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव 245 धावांवर मर्यादित राहिला. तेंडुलकर संघाच्या शौनक गावडे याने 68 धावांत 4 तर कर्णधार आरव यादवने 51 धावांत 3 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तेंडुलकर संघाने 22 षटकांत 1 बाद 71 असे चोख उत्तर दिले आहे.


























































